बांगलादेशात गेल्या आठवड्यात दुर्गापूजा उत्सवादरम्यान हिंदू मंदिरांचा विध्वंस करण्यात आल्याच्या घटनांविरुद्ध अल्पसंख्याक हिंदूंची निदर्शने सुरू असतानाच; समाजमाध्यमावरील एका कथित ईश्वारनिंदात्मक पोस्टच्या मुद्यावर जमावाने बांगलादेशातील हिंदूंच्या ६६ घरांचे नुकसान केले असून, किमान २० घरे पेटवून दिली आहेत.

शंभरहून अधिक लोकांच्या जमावाने जाळपोळ करण्याची ही घटना रंगपूर जिल्ह्याच्या पीरगंज उपजिल्ह्यातील एका खेड्यात रविवारी उशिरा घडली, असे वृत्त बीडीन्यूज२४ डॉट कॉमने दिले.

या खेड्यातील एका हिंदू युवकाने फेसबुकवरील पोस्टमध्ये ‘धर्माचा अनादर केला’ अशी अफवा पसरल्यानंतर या भागात तणाव वाढला. त्यामुळे पोलीस प्रामुख्याने कोळ्यांची वस्ती असलेल्या या गावात पोहचले.

ही घटना रात्री १० वाजेनंतर घडली, मात्र अग्निशामक दलाने थोड्याच वेळात आग विझवली आणि आता परिस्थिती नियंत्रणात आहे, असे सहायक पोलीस अधीक्षक मोहम्मद कमरुझ्झमान यांनी पत्रकारांना सांगितले. यात कुठलीही जीवहानी झाली नाही, मात्र हल्ल्यात ६६ घरांचे नुकसान झाले आणि २० घरे पेटवण्यात आली, असे ते म्हणाले.

या प्रकरणी ५२ संशयितांना अटक करण्यात आली असून, सुरक्षा दलांशी समन्वय साधून इतर संशयितांच्या शोधाची मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पोलीस हिंदू युवकाच्या घराभोवती पहारा देत असताना हल्लेखोरांनी आसपासच्या इतर घरांना आग लावली, असे माध्यमाच्या वृत्तात म्हटले आहे.