scorecardresearch

जोधपूर येथे दोन गटांत हिंसाचार, दगडफेक; संचारबंदी लागू, इंटरनेट बंद

जोधपूर येथील जलोरी गेट भागात सोमवारी रात्री उशिरा स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळय़ापाशी ध्वज उभारण्याचे तसेच तो  हटवण्याचे प्रयत्न झाले.

वृत्तसंस्था, जयपूर : जोधपूर येथील जलोरी गेट भागात सोमवारी रात्री उशिरा स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळय़ापाशी ध्वज उभारण्याचे तसेच तो  हटवण्याचे प्रयत्न झाले. यावरून दोन गटांत झालेल्या वादानंतर काही तासांनी येथे दगडफेक झाली. त्यात काही पोलीस जखमी झाले. मंगळवारी सकाळी सामूहिक प्रार्थनेनंतर पुन्हा हिंसाचारास तोंड फुटले. या भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून  इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. सोमवारी रात्री पोलिसांनी लाठीमार करून व अश्रुधुराने स्थिती आटोक्यात आणली होती.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी बैठक घेतली. जोधपूर हे मुख्यमंत्री गेहलोत यांचे मूळ गाव आहे. त्यात दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि गृहराज्यमंत्री राजेंद्रसिंग यादव यांना तातडीने जोधपूरला हेलिकॉप्टरने रवाना केले. हिंसाचारग्रस्त भागातील स्थिती नियंत्रणात आली असल्याचे सरदारपुरा पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी दिनेश लाखावत यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परशुरामजयंतीनिमित्त सोमवारी रात्री उशिरा काही ध्वज घटनास्थळी उभारण्यात आले होते. परशुरामांना अभिवादनपर ध्वज जेथे लावले तेथून जवळच रमजान ईदनिमित्त नमाजपठण झाले. त्यानंतर स्थानिक मुस्लिम समाजाने ईद असल्याने या भागातील ध्वज हटवल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक हवासिंग घुमरिया यांनी दिली. हा भाग ईदगाहजवळ असल्याने येथे ईदनिमित्त मोठय़ा प्रमाणावर सामूहिक नमाजपठणासाठी येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी या जमावास फिरकू दिले नाही. मात्र, जमावाला पांगवताना तणाव निर्माण झाला व दगडफेक झाली.

केंद्रीय मंत्री शेखावत यांचा  आंदोलनाचा इशारा

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी जोधपूर येथील हिंसाचारासाठी राजस्थानच्या काँग्रेस सरकारवर टीका केली. शहरातील ईदगाहमध्ये सामूहिक नमाजपठणानंतर गडबड करणाऱ्या गटावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. नमाजपठणानंतर दंगलखोरांनी दुकाने-घरांवर प्रचंड दगडफेक केली. स्त्रियांचा विनयभंग केला. काही ठिकाणी सुरीने हल्ला करून अनेकांना भोसकले. परंतु पोलीस मूक साक्षीदार बनून हा हिंसाचार पहात होते.  दंगलखोरांना अटक केली नाही तर इतर पक्षांच्या नेत्यांसह आपण  धरणे आंदोलन करू, असा इशाराही शेखावत यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंगळवारी सांगितले, की जोधपूर येथील धार्मिक तणाव व हिंसाचार हा दुर्दैवी आहे. याला जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. कुठल्या जाती, धर्म अथवा वर्गाचे असले तरी दोषींना रोखून त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी उच्च स्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. समाजकंटकांना शोधून त्यांना पोलीस ठाण्यांच्या स्तरावरच रोखावे. समाजमाध्यमांद्वारे व इतरही प्रकारे अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचे आदेशही त्यांनी दिले. राजस्थानमध्ये सर्वधर्मीय व्यक्ती आपापले सण मोठय़ा प्रेमाने आणि बंधुभावाने साजरे करतात. जोधपूरने नेहमीच सामाजिक सौहार्द जपले. सर्व समाजाच्या प्रातिनिधिक गटांच्या बैठका राज्यभर घेऊन शांतता व विश्वासाचे वातावरण तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. राज्यातील जनतेला त्यांनी शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहनही केले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Violence two groups jodhpur stone throwing curfew imposed internet shut down ysh

ताज्या बातम्या