Salman Khurshid Statement : बांगलादेशात सध्या प्रचंड अराजक माजलं आहे, त्यामुळे हिंसाचार उसळला आहे. तसंच शेख हसीना यांना देश सोडावा लागला. शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला. त्यांना पंतप्रधानपदही सोडावं लागलं आणि देशही सोडावा लागला. ही परिस्थिती असताना काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद आणि सज्जन वर्मा या दोघांनीही बांगलादेश सारखी परिस्थिती भारतात उद्भवू शकते असं म्हटलं आहे. ज्यानंतर भाजपा नेत्यांनी सलमान खुर्शीदवर जोरदार टीका केली आहे. सज्जन वर्मा यांनीही याच आशयाचं वक्तव्य केलं आहे.
बांगलादेशमध्ये काय घडलं?
भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशात अराजक माजलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला. या घटनेनंतर बांगलादेशातील पंतप्रधान निवासात जनता शिरली आणि त्यांनी तिथे तोडफोडही केली. बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारामुळे आत्तापर्यंत ४०० हून जास्त लोकांचा बळी गेला आहे. शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला आहे. या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठकही पार पडली. त्यावेळी सगळ्याच पक्षांनी सरकारला या मुद्द्यावर पाठिंबा दिला. अशात आता सलमान खुर्शीद आणि सज्जन वर्मा या दोन नेत्यांनी बांगलादेशसारखी परिस्थिती भारतातही निर्माण होऊ शकते असं म्हटलं आहे.
काय म्हणाले सलमान खुर्शीद?
“बांगलादेशात जे काही घडतं आहे ते भारतातही घडू शकतं. तिथे काय परिस्थिती आहे ते आपण पाहतो आहोतच. तशीच भारतात उद्भवू शकते.” असं वक्तव्य सलमान खुर्शीद यांनी केलं. शिकवा ए हिंद या मुजीबुर रहमान यांच्या पुस्तकाचं प्रकाश सलमान खुर्शीद यांच्या हस्ते करण्यात आलं. ज्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्याच या वक्तव्याप्रमाणे काँग्रेस नेते सज्जन वर्मा यांनी केलं.
सज्जन वर्मा काय म्हणाले?
“बांगलादेशात मागच्या दोन दिवसात काय घडतं आहे ते आपण पाहिलं आहे. बांगलादेशातील जनता पेटून उठली आहे. बांगलादेशात पंप्रधान निवासात लोक घुसले, राष्ट्रपती भवनातही लोक घुसले. एक दिवस असा येईल की मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे लोक तुमच्याही निवासस्थानात घुसतील.” असं वक्तव्य सज्जन वर्मांनी केलं.
काँग्रेसच्या नेत्यांनी ही वक्तव्य केल्यानंतर आता भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपाच्या नेत्यांनी सलमान खुर्शीद यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
हे पण वाचा- बांगलादेशातील हिंदू निर्वासितांवरून पश्चिम बंगालचं राजकारण कसं तापलंय?
संबित पात्रा काय म्हणाले?
सलमान खुर्शीदच नाही तर काँग्रेसचे इतर काही नेतेही म्हणाले की बांगलादेशात जे घडलं ती परिस्थिती भारतातही उद्भवू शकते. एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. भारतात हिंसाचार उसळेल, अराजक माजेल याचे संकेतच सलमान खुर्शीद यांनी दिले आहेत. काँग्रेसची विचारधारा कशी आहे? तुम्हीच बघा. देशात आग लागेल, दंगल होईल, पंतप्रधानांवर हल्ला होईल हे त्यांचेच नेते राहुल गांधी म्हणत होते. ते का म्हणत होते ते आता कळलं आहे. अशी टीका संबित पात्रा यांनी केली.
अनुराग ठाकूर काय म्हणाले?
भाजपाचे नेते अनुराग ठाकूर म्हणाले, “सलग तिसऱ्यांदा काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसची मानसिकताच देशात अराजक निर्माण करण्याची आहे. भीती आणि भ्रम पसरवणं हा यांचा जुना खेळ आहे. देशाला मागे नेण्यासाठी काँग्रेस काहीही करु शकते. काँग्रेसचे नेते देशाचं नुकसान करत आहेत. देशात भीती पसरवण्याचं काम काँग्रेसकडून केलं जातं आहे. हे काँग्रेसने बंद करायला हवं.” असं अनुराग ठाकूर म्हणाले.
© IE Online Media Services (P) Ltd