बिहारचा तरूण राहुल आणि त्याची कथित प्रेयसी जुली यांच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. बिहारच्या तरूणाशी लग्न करण्यासाठी जुली रशियातून आली आहे असे दावे करण्यात आले. प्रत्यक्षात हे वास्तव नाही, वास्तव वेगळं आहे. कारण जुली ही तरूणी मुळची रशियाची नाहीच शिवाय हे प्रेमप्रकरणही खरं नाही. जाणून घेऊ नेमकं काय प्रकरण आहे आणि सत्य काय आहे.
नेमकं व्हायरल व्हिडीओचं प्रकरण काय?
सोशल मीडियावर बिहारचा तरूण राहुल आणि रशियाहून आलेली त्याची कथित प्रेयसी जुली ही बिहारमध्ये आली. या दोघांचं लग्न नोव्हेंबर महिन्यात होणार आहे अशाही बातम्याही आल्या होत्या. मात्र हे वास्तव नाही. समोर आलेल्या वृत्तानुसार जुली ही तरूणी शिविया नावाच्या एका एनजीओमध्ये काम करते. ही संस्था इंग्लंडमधली आहे, ती तिच्या संस्थेकडून उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडचा दौरा करण्यासाठी आली होती. या दरम्यान ती करत असलेल्या एका व्हिडीओत राहुल हा तरूण दिसतो आहे, त्याने हा व्हिडीओ व्हायरल केला. ज्यानंतर राहुलसाठी ही तरूणी रशियाहून आली आहे अशा अफवांचं पीक आलं. मात्र ही वस्तुस्थिती नाही, जुली ही रशियाची तरूणी नाही तर ती इंग्लंडची आहे. ती आणि राहुल लग्न करणार अशीही काहीही बातमी नाही. कारण ती फक्त व्हिडीओ शूट करताना राहुल त्यात आल्याने त्यांची ओळख झाली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
राहुलचं नावही राहुल नाही
सदर व्हायरल व्हिडीओ हा पूर्णियाचा आहे असंही समोर आलं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये हा व्हिडीओ भागलपूरचा आहे हे सांगितलं गेलं त्यातही काही तथ्य नाही. शिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या युवकाला राहुल म्हणून संबोधलं जातं आहे, त्याचं नाव राहुल नाही. कारण इन्स्टाग्राम प्रोफाईलवर त्याचं नाव नमित भय असं आहे. या प्रकरणी आता भागलपूर पोलीस या युवकाचा शोध घेत आहेत.
राहुलने स्वतः सांगितलं वास्तव
या व्हिडीओत दिसणाऱ्या कथित राहुलने एक नवा व्हिडीओ पोस्ट केला. त्यात त्याने म्हटलं आहे की जुली आणि माझं लग्न होतंय या अफवा आहेत. जुली ही तरूणी माझ्या गावात फिरायला आली होती. ती आमची पाहुणी आहे, आम्ही लग्न वगैरे करतोय या सगळ्या अफवा आहेत त्यांना काहीही अर्थ नाही असंही या राहुल अर्थात नमित भयने सांगितलं आहे. प्रिन्स कुमार नावाच्या एका युजरने या युवकाचे फोटो पोस्ट केले आहेत आणि बिहारमध्ये काहीही होऊ शकतं असं म्हटलं आहे.
शिविया चॅरीटी ही एक NGO आहे. २००८ मध्ये ओली डोनेली यांनी या संस्थेची स्थापना केली होती. ग्रामीण भागातल्या लोकांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देणं हे या NGO चं प्रमुख काम आहे.
