संपूर्ण भारत फिरायचा म्हटलं की मोठं बजेट, प्रवासाची आधीपासून केलेली तयारी आणि राहण्याची व्यवस्था अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. मात्र, एका तरुणीने खिशात केवळ १० हजार रुपये घेऊन संपूर्ण देश फिरण्याचे आव्हान स्वीकारले आहे. इन्स्टाग्रामवर @flyyingxfishh या नावाने व्हिडीओ शेअर करणाऱ्या या तरुणीने आतापर्यंत सहा राज्यांचा प्रवास केला असून, त्यासाठी अवघे दोन हजार रुपये खर्च झाल्याचा दावा केला आहे. तिच्या या अनोख्या प्रवासाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
‘१० हजारांत संपूर्ण भारत फिरणार’
या तरुणीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या प्रवासामागची कल्पना सांगितली. अनेक जण एका ठिकाणी फिरण्यासाठी १० हजार रुपयांचे बजेट ठेवतात, मात्र आपल्याला याच पैशांत संपूर्ण भारत फिरायचा आहे, असं तिने म्हटलं आहे.
“तुमचं १० हजार रुपयांचं बजेट कदाचित एका ठिकाणी फिरण्यासाठी असेल’, पण मला त्याच पैशांत संपूर्ण भारत फिरायचा आहे. ऐकायला हा विनोद वाटतोय ना? पण हा विनोद नाही, तर मी स्वतःलाच दिलेलं आव्हान आहे,” अशा आशयाचं वक्तव्य तिने व्हिडीओमध्ये केलं. आतापर्यंत सहा राज्यांचा प्रवास पूर्ण केला असून, त्यासाठी केवळ दोन हजार रुपये खर्च झाल्याचंही तिने सांगितलं. मात्र, संपूर्ण भारत फिरण्यासाठी उरलेले आठ हजार रुपये पुरतील की नाही, याबाबत तिलाही खात्री नाही.
पैसे संपले तर प्रवासाचं आव्हानही संपणार
“अजून तर संपूर्ण भारत फिरायचा बाकी आहे. माझ्या १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये मला संपूर्ण देश फिरता येईल की नाही, हे माहीत नाही. पैसे संपले, तर माझं आव्हानही तिथेच संपेल. पण मी हे आव्हान पूर्ण करू शकेन का?” असा प्रश्न तिने स्वतःलाच विचारला आहे. तिच्या व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्येही हा प्रवास सोपा नसल्याचं तिने मान्य केलं आहे. १० हजार रुपयांत भारत फिरण्याचा प्रयत्न सुरू असून, आपण शेवटपर्यंत टिकणार की मध्येच हार मानणार, हे जाणून घेण्यासाठी प्रवासाशी जोडून राहण्याचं आवाहन तिने केलं आहे.
कधी मोफत जेवणाची विनंती, तर कधी रेल्वे स्थानकावर प्रतीक्षा
तिच्या इन्स्टाग्रामवरील अन्य व्हिडीओंमधून कमी खर्चात प्रवास करण्यासाठी ती कोणते मार्ग अवलंबते, याची झलक पाहायला मिळते. काही व्हिडीओंमध्ये ती लोकांकडे मोफत जेवणाची विनंती करताना दिसते, तर काही ठिकाणी रेल्वे उशिराने धावल्यामुळे स्थानकावर वेळ घालवताना दिसते. अत्यंत कमी बजेटमध्ये प्रवास करताना कराव्या लागणाऱ्या तडजोडी आणि अचानक उद्भवणाऱ्या अडचणी तिच्या व्हिडीओंमधून समोर येतात.
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
तरुणीच्या या आव्हानाला इन्स्टाग्राम वापरकर्त्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काही जण तिचं कौतुक करत असून, ती किती राज्यांचा प्रवास करू शकते, याबाबत उत्सुकता व्यक्त करत आहेत. तर काहींनी १० हजार रुपयांत संपूर्ण भारत फिरणं शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. काही वापरकर्त्यांनी मात्र तिला एकटीने प्रवास करताना स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे. खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात वैयक्तिक सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये, असंही त्यांनी सुचवलं आहे.
