कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने फरमान खानशी लग्न केलं त्याची चांगलीच चर्चा केली. दरम्यान मी लव्ह जिहाद केला नाही मी फरमानशी हिंदू पद्धतीने लग्न केलं. आम्हाला बदनाम केलं जातं आहे, तसंच माझ्या कुटुंबाला सनोज मिश्रा धमक्या देतो आहे. मला त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, त्याने मला कुठलेही पैसे दिलेले नाहीत, उलट ५० हजार रुपये बाकी आहेत ते मला त्यांच्याकडून घ्यायचे आहेत असाही आरोप मोनालिसाने केले आहेत. दरम्यान मोनालिसाचे सगळे आरोप सनौज मिश्रांनी फेटाळले आहेत.

मोनालिसाचे आरोप काय आहेत?

सनोज मिश्रा चांगला माणूस नाही, त्याने मला दहावेळा चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्याने असं केल्याचं मी जेव्हा माझ्या कुटुंबाला सांगितलं तेव्हा माझ्या कुटुंबाने मला साथ दिली नाही. मला माहित आहे माझ्यावर काय प्रसंग बेतला आहे. मला माहीत आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे. मला न्याय हवा आहे. मी माझ्या कुटुंबाला सांगितलं कुटुंबाने माझी बाजू घेतली नाही. सनोज मिश्राला जेव्हा मी सांगितलं तर म्हणाला हा तुझा पहिला चित्रपट आहे. पहिला चित्रपट आहे तर काय माझ्यावर बलात्कार करणार का? असा प्रश्न मोनालिसाने विचारला आहे.

Monalisa Bhosle With Her husband Farman Khan
मोनालिसा भोसले आणि तिचा पती फरमान (फोटो-PTI)

मोनालिसाचे कुटुंबावरही गंभीर आरोप

मोनालिसाने असं म्हटलं आहे की माझ्या आई वडिलांना माझ्याशी काही घेणंदेणं नाही. मला आईचं प्रेम कधीही मिळालं नाही. माझ्या वडिलांचे दुसऱ्या स्त्रियांशी संबंध आहेत. त्यांना फक्त पैसे हवेत दुसरं काहीही नाही. सनोज मिश्रा माझ्या कुटुंबाला धमक्या देतो आहे. सनोज मिश्रा सांगतोय मी १० कोटी रुपये लावले आहेत. पण त्याने ३ लाख रुपयेही लावले नाहीत. मोनालिसा आणि फरमानची हत्या सनोज मिश्राला करायची आहे. माझं कुटुंबही दुःख झाल्याचं सांगतं आहे पण ते पार्टी करत आहेत, दारु पित आहेत असेही आरोप मोनालिसाने केले आहेत. राधेने प्रेम केलं तेव्हा तिने पाहिलं का की कृष्ण हिंदू आहे की मुस्लिम? फरमान माझ्या आयुष्यात नसता तर मी आत्महत्या केली असती. प्रेम काय आयुष्यात पहिल्यांदा कुणी केलेलं नाही. आजवर अनेक लोकांनी प्रेम केलं आहे. पण आता आम्हाला सुखाने जगू दिलं जात नाही. आम्ही आत्महत्या करायची असेल तर आम्हाला सरकारने तसं सांगावं असंही मोनालिसाने म्हटलं आहे.

सनोज मिश्रांनी आरोप फेटाळले आहेत

मोनालिसाचं लव्ह जिहादचं जे प्रकरण झालं त्यानंतर मी एक मोहीम सुरु केली. आता प्रकरण दुसऱ्या वळणाला जातं आहे. केरळचे लोक माझ्याविरोधात कट रचत आहेत. माझ्यावर मोनालिसा आरोप करते आहे. जिहादी मानसिकतेचे लोक कुठल्या प्रकारे ब्रेनवॉश करतात हे दिसून येतं. आज मोनालिसा म्हणते आहे की तिला वडिलांपासून धोका आहे. त्यांना काय वाटत असेल याचाही विचार मी करु शकतो. मी जिहादी मानसिकतेच्या लोकांसमोर झुकणार नाही. असं सनोज मिश्रा यांनी म्हटलं आहे.