Monalisa Bhosle : कुंभमेळ्यामुळे व्हायरल झालेल्या मोनालिसा भोसलेने मागील आठवड्यात लग्न केलं. फरमान खान या तिच्या प्रियकराशी तिने लग्न केलं. फरमान याने हिंदू रितीप्रमाणे मोनालिसाशी लग्न केलं. ज्यानंतर या दोघांनी पत्रकार परिषद घेतली. आम्ही हिंदू पद्धतीने लग्न केलं आहे, हा लव्ह जिहाद नाही असं या दोघांनीही सांगितलं. दरम्यान आता मोनालिसाच्या आई वडिलांनी फरमान खानच्या विरोधात तक्रार केली असून हा लव्ह जिहादच असल्याचा आरोप केला आहे.

जय सिंग भोसलेंनी काय म्हटलं आहे?

मोनिलासा भोसलेचे वडील म्हणाले की फरमानने मोनालिसाला त्याच्या जाळ्यात ओढलं. मोनालिसाचं लग्न होणार आहे हे तर मला माहीत नव्हतं असंही जय सिंग भोसले म्हणाले. केरळमध्ये आम्हाला फसवणूक करुन नेण्यात आलं. हे लव्ह जिहादचं प्रकरण आहे. त्यामुळे आम्ही पोलिसात तक्रार दिली आहे असं मोनालिसा भोसलेच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलं. मोनालिसा भोसलेच्या वडिलांनी मागच्या आठवड्यातही हे सांगितलं होतं की मोनालिसाचं लग्न हे तिला फसवून करण्यात आलं आहे.

मोनालिसाच्या लग्नाबाबत वकील नाझिया इलाही काय म्हणाल्या होत्या?

मोनालिसा भोसलेचं लग्न हा लव्ह जिहादच आहे. हे साधंसुधं लग्न नाही. इस्लामिक, जिहादी आणि PFI ने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात हिंदू मॅरेज अॅक्ट १९५६ चं उल्लंघनही करण्यात आलं आहे. हिंदू प्रथा आणि विवाह संस्कार यांचा गैरवापर केला गेला आहे. तसंच हिंदू प्रथांची खिल्ली उडवण्यात आली आहे. कारण फरमान खान पत्रकार परिषदेत म्हणाला की तो अजूनही मुसलमान आहे. एक मुसलमान माणूस हिंदू पद्धतीने लग्न करु कसं शकतो? जर हिंदू मॅरेज अॅक्टनुसार त्याने लग्न केलं असेल तर हिंदुत्व स्वीकारल्याचा कुठला पुरावा त्याच्याकडे आहे जो त्याने अजून दाखवलेला नाही? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाच्या वकील नाझिया इलाही यांनी केला आहे.

मोनालिसा भोसलेचं लग्न तिच्या घरातल्यांना पसंत नाही

मोनालिसा भोसलेने फरमान खान या तिच्या प्रियकराशी केलेलं लग्न तिच्या घरातल्यांना पसंत नाही. मोनालिसाच्या वडिलांनी हे देखील सांगितलं आहे की तिला फसवून लग्नाच्या जाळ्यात ओढण्यात आलं आहे. केरळला जाण्यापूर्वी आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती की फरमान खानशी तिचं लग्न होणार आहे. मोनालिसाच्या आजीनेही या लग्नाबाबत नाराजी व्यक्त केली आहे, आता तिच्या आई वडिलांनी फरमान खानच्या विरोधात लव्ह जिहादचा आरोप करत पोलिसांत तक्रार केली.