Kanpur Viral Video : मंदिरात चोरी झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आलेल्या आहेत. मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याच्या घटनाही अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत. या संदर्भातील अनेक व्हिडीओही व्हायरल झाले समोर आलेले आहेत. आता अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये घडली आहे. एका चोरट्याने एका शिवमंदिरामधील पितळाचे कलश चोरल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यासंदर्भातील इंडिया टुडेनीही वृत्त दिलं आहे.

व्हायरल व्हिडीओत काय?

व्हायरल व्हिडीओमध्ये एक चोरटा कानपूरमधील एका मंदिरामध्ये आलेला दिसत आहे. त्यानंतर चोरटा मंदिराच्या परिसरात कोणी आहे का? हे पाहत असल्याचंही दिसत आहे. चोरट्याने मंदिरात ठेवलेली घंटा चोरण्याचा प्रयत्न केला. त्याने खिशातून कटर काढले आणि साखळी कापायला सुरुवात केली. पण साखळी कापू शकली नाही. त्यानंतर चोरट्याने मंदिरात ठेवलेले कलश चोरण्याचे ठरवले. त्यानंतर चोरट्याने पितळाच्या कलशामधील जल शिवलिंगाला अर्पण केले, त्यानंतर आपल्याकडील एका बॅगेत ते पितळाचे कलश टाकले आणि चोरटा फरार झाला. मंदिर प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

हेही वाचा : Video viral: स्विमिंग पुलमधील मजामस्ती अंगलट; काही कळण्याआधीच तरुणाबरोबर घडलं भयंकर

दरम्यान, चोरट्याने मंदिरातील पितळाचे कलश चोरून नेत असल्याच्या या घटनेचा सर्व प्रकार मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना कानपूरच्या नवाबगंज भागातील एका मंदिरात घडल्याची माहिती सांगितली जात आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.