Viral Video Uttar Pradesh Girl One Leg School story : उत्तर प्रदेशमधील बलिया येथील एका सात वर्षांच्या चिमुरडीने जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या भावूक आवाहनाने सोशल मीडियावरील अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पहिलीत शिकणाऱ्या रागिणीला तिच्या शाळेचा रोजचा प्रवास सोपा व्हावा यासाठी ट्रायसायकल (तीन चाकांची सायकल) हवी आहे. बलियाच्या मनियर शिक्षण क्षेत्रातील ‘प्राथमिक शाळा दिघेडा’ येथे ती शिकते.

रागिणी अवघ्या सहा महिन्यांची असताना एका रस्ते अपघातात तिने आपला एक पाय गमावला होता. या अपंगत्वावर मात करत, शिक्षण घेण्याची तिची जिद्द कायम आहे. ‘न्यूज१८ हिंदी’नुसार, सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये रागिणीने जिल्हा प्रशासनाला भावनिक साद घालत म्हटलं आहे की, “डीएम अंकल, माझा एक पाय खराब झाला आहे, मला सायकल मिळवून द्या, मी रोज शाळेत शिकायला येईन.”

४०० मीटर एका पायाने लंगडत जाते शाळेत

रागिनीचे घर तिच्या शाळेपासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर आहे. इतर मुलांसाठी हे अंतर चालणे अत्यंत सोपं असले, तरी रागिनीला मात्र रोज एका पायाने उड्या मारत (लंगडत) शाळेत जावं लागतं. हा प्रवास तिच्यासाठी शारीरिकदृष्ट्या अत्यंत त्रासदायक आणि थकवणारा आहे.

एक्स (ट्विटर) वर @Benarasiyaa नावाच्या युझरने तिची ही परिस्थिती मांडत, एका गरजू मुलीला मूलभूत मदतीसाठी सोशल मीडियाच्या क्रांतीची वाट का पाहावी लागते? असा सवाल उपस्थित केला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “प्रत्येक वेळी जेव्हा एखाद्या गरीब मुलीला बऱ्याच काळापूर्वी मिळायला हवी असलेली ट्रायसायकल हवी असते, तेव्हा आपल्याला आधी सोशल मीडियावर मोहीम उघडावी लागते. स्थानिक प्रशासन इतके अकार्यक्षम का आहे की त्यांच्याकडून अपेक्षित असलेली साधी मदतही ते स्वतःहून करताना दिसत नाहीत?”

दुसऱ्या एका पोस्टमध्ये या युझरने रागिनीच्या परिस्थितीचं वर्णन करताना लिहिलं, “७ वर्षांच्या रागिनीने ती अवघ्या ६ महिन्यांची असताना अपघातात आपला डावा पाय गमावला. ती यूपीच्या बलियामधील सरकारी शाळेत लंगडत जाते. तिला तिचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी फक्त एक ट्रायसायकल हवी आहे. या पोस्ट्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्या असून अनेकांनी या चिमुरडीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसंच तिला केवळ वाहतुकीचं साधन देण्याऐवजी कायमस्वरूपी मदत देण्याची मागणी केली आहे.

एका युझरने लिहिलं की, ट्रायसायकल हा केवळ तात्पुरता उपाय असू शकतो. तिला उपचारांची गरज आहे, कारण ती अजून फक्त ७ वर्षांची असून तिची वाढ होणे बाकी आहे. दुसऱ्या युझरने शाळा प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारलं, “शाळेतील शिक्षक आंधळे होते का? ५ ते ८ हजार रुपयांमध्ये ट्रायसायकल येते, त्यांनी क्राउड फंडिंग (लोकवर्गणी) करायला हवी होती किंवा किमान जिल्हाधिकाऱ्यांना कळवायला हवं होतं किंवा सरकारी रुग्णालयात सुट्टीच्या दिवशी नेऊन तिला दाखवायला हवं होतं.”

तर तिसऱ्या एका युझरने खेद व्यक्त करत म्हटलं, “जेव्हा जेव्हा अशा बातम्या समोर येतात, तेव्हा आपण एक देश म्हणून अपयशी ठरल्यासारखं वाटतं. आपला देश गरीब नागरिकांसाठी खूप काही करू शकतो. सरकारने तिला तातडीने मदत करावी, अशी आशा आहे.”

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

दरम्यान, तिचा हा व्हिडिओ जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला असून त्यांनी दखल घेतली आहे. अपघातानंतर एका पायावर लंगडत शाळेत जाणाऱ्या ७ वर्षांच्या रागिणीची बलिया प्रशासनाने दखल घेतली. जिल्हाधिकारी मंगला प्रसाद सिंह यांनी अधिकारी आणि एक डॉक्टर पाठवले आहेत. लवकरच एक तीनचाकी गाडी मिळण्याची शक्यता आहे.