Viral video woman tears clothes train ticket check: एक्स्प्रेसमध्ये टीसीबरोबर झालेल्या वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये टीसीबरोबर भांडण करताना एक तरुणी चक्क तिचे कपडे फाडताना दिसतेय. टीसीने तिकीट दाखवण्यास सांगितल्यानंतर या महिलेने वादादरम्यान स्वतःचे कपडे फाडल्याचा आणि रेल्वे अधिकाऱ्यावर गैरवर्तनाचा आरोप केल्याचा दावा केला जात आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्यांनुसार, नियमित तिकीट तपासणीदरम्यान जेव्हा टीटीई या महिलेपाशी पोहोचला तेव्हा हा वाद सुरू झाला. तिच्याकडे वैध तिकीट नव्हतं आणि तिने त्याऐवजी पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तिने रेल्वे अधिकाऱ्याला आपला भाऊ रेल्वेत काम करत असल्याचं सांगितल्याचा दावाही केला जात आहे. टीटीईने तिच्या तिकिटाबद्दल विचारपूस सुरूच ठेवल्यामुळे हा वाद आणखी वाढला. या संभाषणादरम्यान ती महिला फोनवर तिच्या भावाशी बोलताना ऐकू येत असल्याचा दावा केला आहे. यानंतर या घटनेला वेगळं वळण मिळालं, जेव्हा महिलेने स्वतःचे कपडे ओढून फाडल्याचे फाडले. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. कपडे फाडताना तिने टीटीईवर आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा व विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

तसंच तिने आपत्कालीन हेल्पलाइनवर संपर्क साधण्याची धमकीही दिली. दरम्यान, टीटीईने आपल्या मोबाईल फोनवर या संपूर्ण वादाचं रेकॉर्डिंग केलं होतं. ओळख विचारली असता, तिने नाव ‘राधिका तिवारी’ असल्याचं सांगितलं. हे रेकॉर्डिंग आता ऑनलाईन चर्चेचा मुख्य विषय बनले असून, सोशल मीडिया युजर्स तिकीट तपासणीच्या वादादरम्यान नक्की काय घडले याच्या संदर्भासाठी हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

दरम्यान, तिला ताब्यात घेण्यात आलं होतं. तिच्यावर कारवाई करण्यात आली असून तिला एक हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आल्याचं वृत्त आहे.