जगभरात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच चीनवर करोनाचा पसरवण्याचा आरोप अनेक देशांकडून करण्यात येत असून चीन कायमच आपल्यावरील या आरोपाचं खंडन करत आला आहे. तसंच आपण कोणतीही माहिती लपवली नसल्याचा दावाही चीनने अनेकदा केला होता.. दरम्यान, हाँगकाँगच्या एका शास्त्रज्ञानं चीनला या विषाणूची माहिती होती होती आणि जागतिक आरोग्य संघटनेनंदेखील कोणतंही पाऊल उचललं नसल्याचा दावा केला आहे. हाँगकाँगमधील ‘स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’मधील वायरॉलॉजी अँड इम्यूनॉलजीच्या तज्ज्ञ डॉ. लि मेंग येन यांनी चीनवर या विषाणूची माहिती लपवल्याचा आरोप केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार मलिक पेरिस यांनीदेखील या प्रकरणी कोणताही निर्णय घेतला नसल्याचा आरोप लि मेंग यांनी केला. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेवर गंभीर आरोप केले आहेत. “ज्यावेळी चीनच्या सरकारनं करोना विषाणूबद्दल सांगितलं, त्यापूर्वीपासूनच त्यांना याबद्दल माहिती होती असं माझं मत आहे. ज्या तज्ज्ञांनी या महामारीच्या पूर्वी जे संशोधन केलं त्याकडेही दुर्लक्ष केलं गेलं. जर त्याकडे लक्ष दिलं गेलं असतं तर अनेकांची जीव वाचवता आले असते,” असंही त्या म्हणाल्या.

सध्या चीन आपली प्रतीमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही लि मेंग यांनी केला आहे. सध्या त्या आपले प्राण वाचवण्यासाठी हाँगकाँगमधून बाहेर गेल्या आहेत. लि मेंग या जगातील त्या तज्ज्ञांपैकी एक आहेत ज्यांनी सर्वप्रथम करोना विषाणूवर अभ्यास सुरू केला होता. त्यांना विद्यापीठ/जागतिक आरोग्य संघटनेच्या लॅबमध्ये सुपरवायझर्सनं २०१९ च्या डिसेंबर महिन्यातच चीनमधून मिळालेल्या SARS सारख्या विषाणूंच्या क्लस्टरला अभ्यास करण्यास दिलं होतं.

मानवात पसरण्याची शक्यता

“हा विषाणू मानवामध्येही पसरू शकतो अशी शक्यता चीनमधील रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रातील शास्त्रज्ञ मित्रानं डिसेंबर महिन्यातच व्यक्त केली होती. परंतु त्यानंतर बऱ्याच कालावधीनं याला दुजोरा देण्यात आला. त्यानंतर पुन्हा जानेवारी महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेनं चीनच्या प्रशासनाच्या हवाल्यानं एक महिती दिली. तसंच या विषाणुमुळे काही लोकांमध्ये गंभीर स्वरूपाचे आजार दिसत असल्याचं म्हटलं होतं. तर दुसरीकडे हा विषाणू सहजरित्या लोकांमध्ये पसरत नसल्याचाही दावा केला होता. परंतु अचानक त्यानंतर यावर चर्चा करणारे डॉक्टरही शांत बसले,” असंही लि मेंग म्हणाल्या.