देशात करोनाचं संकट आणखी फोफावू नये यासाठी सर्वच स्तरावर मोठे प्रयत्न होताना दिसत आहेत. अनेक डॉक्टर, नर्स, पोलीस आणि अधिकारी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता करोनाशी लढा देत आहेत. अशीच एक प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टन महापालिकेच्या आयुक्त सृजना गुमाला यांची ही कहाणी आहे. आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर त्या २२ दिवसांतच पुन्हा कामावर रुजू झाल्या आणि करोनाशी लढाईत सहभागी झाल्या आहेत.

महिनाभरापूर्वी सृजना यांनी मुलाला जन्म दिला. पण करोनाविरोधात लढण्यासाठी त्यानंतर लगेच केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली. या काळात महापालिकेला त्यांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी कोणताही विचार न करता पुन्हा ड्युटीवर रुजू होण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना त्यांचे पती आणि सासू या दोघांनीही उत्तम साथ दिल्याचे सृजना सांगतात.

सृजना यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, आपल्या लहान मुलाला दूध पाजण्यासाठी त्या दर चार तासांनी घरी जातात आणि त्यानंतर परत कामावर येतात. उरलेल्या काळात त्यांचे पती आणि सासू मुलाला सांभाळतात.

मी या काळात कामावर असणं हे अत्यंत गरजेचं होतं. या कठीण काळात माझी जबाबदारी मला माहीत आहे, त्यामुळे मी कामावर रुजू झाल्याचेही सृजना यांनी स्पष्ट केले.