Vizag Navy employee kills girlfriend: देशाला हादरवून सोडणारे श्रद्धा वालकर हत्या प्रकरण २०२२ मध्ये उघडकीस आले होते. त्याच सारख्या अमानुष पद्धतीने नैदलाच्या विवाहित कर्मचाऱ्याने प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे घडली आहे. पत्नी माहेरी गेल्यानंतर या कर्मचाऱ्याने प्रेयसीला घरी बोलवून घेतले. घरी आल्यानंतर दोघांमध्ये तीव्र स्वरुपाचे भांडण झाले. खून केल्यानंतर प्रेयसीच्या शरीराचे तुकडे केले आणि काही तुकडे बॅगेत भरुन फेकून दिले तर काही तुकडे घरातच फ्रिजमध्ये ठेवले, अशी धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे.
डेटींग अॅपवरुन ओळख आणि प्रेम
रवींद्र (पूर्ण नाव समजू शकले नाही) असे या संशयित नौदलाच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. रवींद्र भारतीय नौदलाच्या देगा या जहाजावर कार्यरत आहे. तर, पोलिपल्ली मोनिका असे त्याने खून केलेल्या त्याच्या प्रेयसीचे नाव आहे. ३५ वर्षीय रवींद्र आणि २९ वर्षीय मोनिका यांची एका डेटींग अॅपवरुन ओळख झाली होती. कालांतराने दोघांमध्ये प्रेम झाले. दोघेही विशाखापट्टणम येथील पार्क, सिनेमागृह आणि विविध ठिकाणी भेटत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हत्येनंतर शरीराचे केले तुकडे
रवींद्रची पत्नी चिंतादा माहेरी गेली होती. पत्नी घरी नसल्याने प्रेयसीबरोबर एकांतात वेळ घालवत येईल म्हणून रवींद्रने मोनिकाला घरी बोलवून घेतले. मोनिका घरी आल्यानंतर दोघांमध्ये काडक्याचे भांडण झाले. रवींद्रने रागाच्या भरात मोनिकांला सुरीने भोसकून ठार केले. यानंतर त्याने मोनिकाच्या शरीराचे अनेक तुकडे केले. शरीराचे काही तुकडे त्याने बॅगेत भरुन अज्ञातस्थळी फेकून दिले. तर उरलेले भाग घरात फ्रिजमध्ये ठेवले.
रवींद्रचे आरोप काय?
रवींद्र स्वत: पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. प्रेयसी मोनिकाला साडेतीन लाख रुपये घेतले होते आणि दोघांमधील संबंध बायकोला सांगेन अशी धमकी देत होती, असा आरोप रवींद्रने केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली त्यावेळी फ्रिजमध्ये शरीराचे तुकडे आढळून आले. पण, मोनिकाचं डोकं आढळून आले नाही. रवींद्रने त्याने इतरत्र कुठेतरी विल्हेवाट लावल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण
१८ मे २०२२ रोजी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे देश हादरला होता. दिल्लीच्या फ्लॅटमध्ये श्रद्धा वालकरचा लिव्ह-इन पार्टनर, आफताब अमीन पूनावाला याने गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले होते. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करुन एका रेफ्रिजरेटरमध्ये भरुन ठेवले होते. यानंतर त्याने दिल्लीत विविध भागात त्याने शरीराचे तुकडे फेकून दिले होते.
