जम्मू-काश्मीर सरकारने फुटीरतावादी नेता मसरत आलम याची सुटका केल्याने केंद्र सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज असतानाच सोमवारी, पाकिस्तान दिवसाच्या निमित्ताने येथील पाकिस्तान उच्चायुक्तालयात आयोजित मेजवानीला परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी हजेरी लावली. हुर्रियतचे नेते सईद अली शाह गिलानी हेही या मेजवानीसाठी उपस्थित होते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मात्र या मेजवानीला जाणे टाळले.
काश्मिरातील सत्तेत पीडीपीबरोबर भाजपही सहभागी झाला आहे. मात्र, मसरत आलमच्या सुटकेमुळे तेथे पीडीपीशी बेबनाव निर्माण झाला आहे. या पाश्र्वभूमीवर भाजप व संघाच्या समन्वय  बैठकीत संघाने काश्मिरातील धोरणाबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. मात्र, असे असतानाही सोमवारी, पाकिस्तान दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानपुढे नांगी टाकल्याचे चित्र निर्माण झाले. २३ मार्च १९४० रोजी मुस्लिम लीगने मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र असावे, अशा आशयाचा ठराव मंजूर केला होता. त्याचा वर्धापनदिन म्हणून ‘पाकिस्तान दिवस’ साजरा केला जातो. या निमित्ताने दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात मेजवानी आयोजित करण्यात आली होती. त्यास दस्तुरखुद्द परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, स्वराज यांनी या मेजवानीला जाण्याचे टाळले. परंतु माजी लष्करप्रमुख व परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी या मेजवानीला हजेरी लावली. काश्मिरातील अनेक फुटीरतावादी नेतेही या मेजवानीला उपस्थित होते.
दरम्यान, पाकिस्तान दिवसाच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे अभिष्टचिंतन करताना उभय देशांतील वादाचे विषय चर्चेद्वारे सोडवता येतील, असे स्पष्ट केले. पाकिस्तानने दहशतवादाचा त्याग करावा, असे आवाहनही त्यांनी केले. पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांनी पाकिस्तान दिनानिमित्ताने राष्ट्राला उद्देशून भाषण करताना भारताशी मैत्री हवी असल्याचे स्पष्ट केले. मात्र, काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसारच सुटला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.