क्रायमिया स्वतंत्र झाल्यानंतर प्रथमच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे येथे आगमन झाले. नाझी जर्मनीवर मिळविलेल्या विजयाच्या स्मृती जागविणारे लष्करी संचलनही येथील लाल चौकात रशियाच्या सैन्यातर्फे करण्यात आले. एकीकडे पूर्व युक्रेनमध्ये रशियाचे समर्थक युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी सार्वमत चाचणी घेण्याच्या तयारीत आहेत, तर त्याच वेळी बंडखोरांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. या पाश्र्वभूमीवर पुतिन क्रायमियात काळ्या समुद्रातील नौदलाचे विशाल संचलन पाहणार आहेत.
पूर्व युक्रेनमध्ये रशियासमर्थक घुसखोर तुलनेने कमी असले तरीही त्यांनी तेथील सरकारी इमारतींवर कब्जा केला आहे. तर रशिया येथील असंतोषास खतपाणी घालत असल्याचा पाश्चिमात्य राष्ट्रांचा आरोप आहे. नर्ॉमडी येथील विजयाच्या ७०व्या स्मृतिदिनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह जगभरातील नेते फ्रान्समध्ये जमणार आहेत. मात्र, त्या वेळी पुतिन यांच्याशी चर्चा करण्याचा ओबामा यांचा कोणताही मानस नसल्याचे व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

विजय दिनी रशियाकडून फुटीरतेस उत्तेजन
दुसऱ्या जागतिक महायुद्धातील विजय दिन साजरा करताना व्लादिमिर पुतिन युक्रेनमधील फुटीरतेस चालना देत आहेत. त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे तसेच उक्ती आणि कृती यांच्यातील तफावतीमुळे आपल्याला रशियाच्या हालचालींची काळजी वाटते, अशा शब्दांत युक्रेनचे पंतप्रधान अर्सेनी यात्सेनयुक यांनी आपल्या मनातील भीती व्यक्त केली.