अमेरिकन सरकार गुप्तहेर संघटनांचं बिंग फोडणाऱ्या एडवर्ड स्नोडेन यांना रशियाचं नागरिकत्व देण्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्नोडेन यांना रशियन नागरिकत्व देण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून रशियात आश्रय घेतलेल्या स्नोडेन यांना रशियन नागरिकाचा दर्जा मिळाला आहे.

३९ वर्षीय एडवर्ड स्नोडेन यांनी २०१३ साली अमेरिकन सरकार आणि गुप्तहेर संघटनांचे संवेदनशील कागदपत्रे लीक केली होती. देशाअंतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन गुप्तहेर संघटना कशाप्रकारे महत्त्वाच्या लोकांवर पाळत ठेवत आहेत, याचा भंडाफोड स्नोडेन यांनी केला होता. यामुळे अमेरिकन सरकारची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली होती. या पेपर लीकनंतर स्नोडेन यांनी रशियात आश्रय घेतला होता.

हेही वाचा- ‘स्नोडेन फाइल्स’चे परिणाम

हेरगिरी केल्याप्रकरणी स्नोडेन यांच्यावर अमेरिकन सरकारने देशद्रोहाचा दाखल केला आहे. या फौजदारी खटल्याला सामोरं जाण्यासाठी स्नोडेन यांना अमेरिकेच्या ताब्यात देण्यात यावं, अशी मागणी अमेरिकन अधिकारी मागील अनेक वर्षांपासून करत आहेत.