Vladimir Putin India Visit BRICS Summit: दिल्लीत १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी १८ वी ब्रिक्स शिखर परिषद होत आहे. या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज (११ सप्टेंबर) दिल्लीत दाखल झाले आहेत. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे देखील शनिवारी भारत दौर्‍यावर येणार आहेत.

व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये आज द्विपक्षीय बैठक होणार आहे. पुतीन आणि पंतप्रधान मोदी यांच्या या बैठकीत भारत आणि रशियामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काही महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुतीन आणि मोदी यांची ही भेट फक्त ब्रिक्स शिखर परिषदेसाठी मर्यादित न राहता भारत आणि रशियातील संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

पुतिन तीन दिवस भारत दौऱ्यावर

व्लादिमीर पुतिन हे शुक्रवारी भारतात दाखल झाले आहेत. ते पुढील तीन दिवस भारतात असणार आहेत. या दौऱ्यात ते १८ व्या ब्रिक्स (BRICS) परिषदेत सहभागी होणार आहेत. तसेच व्यापार, गुंतवणूक व ऊर्जा क्षेत्रासह आदी महत्वाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे.

मोदी आणि पुतिन यांची भेट कधी?

व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात शुक्रवारी दुपारी ३:३० वाजता द्विपक्षीय चर्चा होणार आहे. या बैठकीत द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याबरोबरच संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान, औषधनिर्माण आणि जनसंपर्क या क्षेत्रांतील सहकार्य बळकट करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच युक्रेनमधील संघर्ष आणि शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या अनुषंगानेही या चर्चेत प्रमुख विषय असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांची याआधी गेल्या आठवड्यात बिश्केक येथे झालेल्या ‘एससीओ’ शिखर परिषदेदरम्यान भेट झाली होती. त्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधील संघर्ष त्वरित थांबवण्याचं आवाहन पुतिन यांना केलं होतं.

भारतासाठी २०२६ ची ‘ब्रिक्स’ परिषद का महत्त्वाची आहे?

१८ वी ‘ब्रिक्स’ परिषद नवी दिल्लीमध्ये १२ आणि १३ सप्टेंबरला आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी ‘बिल्डिंग रेझिलन्स अँड इनोव्हेशन फॉर कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी’ हे घोषवाक्य असून जनकेंद्रित आणि मानवतेला प्राधान्य देणारा दृष्टिकोन अवलंबिण्याची भूमिका घेण्यात आलेली आहे.

‘ब्रिक्स’ गटाची वैशिष्ट्ये काय?

भारत, चीन, ब्राझील आणि रशिया यांसारख्या देशांना जागतिक पातळीवरील आर्थिक व राजकीय निर्णयांमध्ये अधिक प्रभावी भूमिका बजावता यावी, यासाठी २००९ मध्ये पहिल्यांदा ब्रिक परिषद आयोजित करण्यात आली. पुढे त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाला. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या इंग्रजी आद्याक्षरांवरून या गटाचे ‘ब्रिक्स’ नामकरण करण्यात आले. या गटाचा विस्तार होत त्यामध्ये इजिप्त, इथियोपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला.

भारत आणि चीन या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांचा या गटामध्ये समावेश होत असल्याने गटाच्या ११ सदस्य देशांची लोकसंख्या चार अब्जापेक्षा अधिक असून ती जागतिक लोकसंख्येच्या जवळपास ५० टक्के आहे. त्यामुळे जागतिक व्यवस्थांवर परिणाम करणाऱ्या निर्णयांमध्ये या देशांना स्थान मिळणे किती महत्त्वाचे आहे, याचा अंदाज लावता येईल. त्याबरोबरच बेलारुस, बोलिव्हिया, क्युबा, कझाकस्तान, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम हे भागीदार देश आहेत.