रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे २०२१ नंतर पहिल्यांदाच दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या भेटीवेळी पुतिन यांनी एका कार्यक्रमात जेव्हा दिग्गज अभिनेते राज कपूर हे भारतीय चित्रपटसृष्टीवर राज्य करत होते आणि त्यांची रशियामध्ये देखील क्रेझ होती त्या काळातील भारताची आठवण काढली. तेव्हापासून खूप काही बदलले आहे, पण रशिया-भारत मैत्री मात्र या दशकांमध्ये आणखी मजबूतच झाली असल्याचे पुतिन म्हणाले आहेत. पुतिन हे नवी दिल्लीतील रशियन सरकारच्या मालकीचे चॅनल ‘आरटी इंडिया’च्या लाँचवेळी बोलत होते.

पुतिन काय म्हणाले?

“राज कपूर यांच्या काळापासून खूप काळ उलटून गेला, भारत खूप मोठ्या प्रमाणात बदलला आहे. पण तेव्हाच्या काळात…. व्लादिमीर वायसोट्स्की यांनी लिहिलेल्या राज कपूर यांच्याबद्दलच्या गाण्यातील शब्द सहज आठवले. पण असे इतरही शब्द आहेत,” असे पुतिन यावेळी म्हणाले.

व्लादिमीर वायसोट्स्की हे एक गायक, कवी आणि अभिनेते होते. तसेच ते २०व्या शतकातील रशियामधील सर्वाधिक प्रभावशाली सांस्कृतिक व्यक्तिमत्वापैकी एक होते. त्यांनी १९५०च्या काळातील भारतीय सिनेमावर, विशेषतः राज कपूर यांच्यापासून प्रेरणा घेऊन एक विनोदी गाणे लिहीले होते.

जुन्या काळाच्या तुलनेत भारताच्या समृद्धीमध्ये झालेली मोठी वाढ देखील रशियन राष्ट्राध्यक्षांनी यावेळी नमूद केली. देशाची अर्थव्यवस्था बदलली असल्याचे पुतिन यावेळी म्हणाले. “सांगितले जाते की पूर्वी योगी करू शकत होते. ते वर्षभर काहीही खात नसत, आणि आता ते विक्रम मोडतात. ते सर्वकाही खातात आणि पितात आणि तुम्हाला माहिती आहे, हा एखादा विनोद वाटेल, पण खरं तर, यात बरंच सत्य आहे. कारण भारताची अर्थव्यवस्था बदलली आहे,,” असे पुतिन यांनी नमूद केले.

“एक भागीदार म्हणून भारताच्या क्षमता बदलल्या आहेत, मात्र आपल्यातील सहकार्याच्या विकासादरम्यान मैत्री आणि परस्पर हितसंबंध, ही एक गोष्ट शिल्लक राहिली आहे” असेही पुतिन यावेळी म्हणाले.

भारत आणि रशिया यांनी तेलाच्या खरेदीच्या मुद्द्यावर अमेरिकन टॅरिफ आणि निर्बंध यांच्या दबावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्यासाठी पाच वर्षांच्या योजनेवर सहमती दर्शवली. पुतिन यांच्याबरोबर एक संयुक्त निवेदन जारी करताना पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांमधील २५ वर्षांच्या भागीदारीचा सन्मान केला.

२३ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेचा भाग म्हणून हैदराबाद हाऊस येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चांमध्ये दोन्ही नेत्यांनी आर्थिक सहकार्य, ऊर्जा संबंध आणि सेक्युरिटी कोर्डिनेशन वाढवण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. यावेळी संरक्षण, व्यापार, कनेक्टिव्हिटी, आणि दहशतवादविरोध या मुद्द्यांवर देखील चर्चा झाली.

पुतिन हे गुरुवारी संध्याकाळी भारतात दाखल झाले आणि त्यानंतर मोदींनी त्यांच्यासाठी डिनरचे आयोजन केले होते. शुक्रवारी सकळी त्यांनी राष्ट्रपती भवन येथे गार्ड ऑफ ऑनर स्वीकारला आणि राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांची भेट घेतली. तसेच द्विपक्षीय चर्चा आणि संयुक्त निवेदन जारी करण्यापूर्वी पुतिन यांनी राजघाट येथे अदरांजली वाहिली