सेंट पीटर्सबर्ग : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पाचव्या पिढीचे अत्याधुनिक लढाऊ विमान सुखोई-५७ पुन्हा एकदा भारताला देऊ केले असून, भारताबरोबर सहउत्पादनही करण्याची रशियाची तयारी आहे, असे म्हटले आहे. दोन्ही देशांतील सामरिक भागीदारी त्यामुळे अधिक मजबूत होईल, असे ते म्हणाले.

रशिया भारताचा दीर्घ काळापासून संरक्षण साहित्याचा पुरवठादार राहिला आहे. मात्र, युक्रेन युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे भारताला संरक्षण साहित्यासाठी आणखी काही देशांकडे वळावे लागले. पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाचा ‘अत्याधुनिक बहुउद्देशीय लढाऊ विमान’ (एएमसीए) हा स्वदेशी प्रकल्प भारताने हातात घेतला आहे. मात्र, त्यास वेळ लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी भारताला पुन्हा एकदा रशियाचे सुखोई-५७ लढाऊ विमान देऊ केले आहे. जगभरातील वृत्तसंस्थांच्या पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. या पत्रकारांमध्ये ‘पीटीआय’चे विजय जोशी हे केवळ भारतीय होते. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला पुतिन यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘सुखोई-५७’ विमान आम्ही भारतामध्ये त्यांच्याबरोबरही उत्पादन करू शकतो.

रशिया अद्यापही भारताने हे विमान घ्यावे, यासाठी आग्रही आहे. हे विमान आताच्या काळाशी सुसंगत आणि अत्याधुनिक आहे. मात्र, आमचा मित्रदेश असलेल्या भारताने या बाबत ‘बघू या’ असे उत्तर दिले आहे. तत्त्वत: भारत-रशियाचे हे संयुक्त उत्पादन होऊ शकते. आम्ही ते स्वतंत्रपणे तयार केले आहे आणि आम्ही भारतामध्येही काम करू शकतो. कुठल्याही प्रकारची मर्यादा त्यासाठी येणार नाही. हवाई संरक्षण यंत्रणेसाठीही रशियाची भारताबरोबर काम करण्याची तयारी आहे.’

भारत देशी बनावटीची ‘सुदर्शन चक्र’ यंत्रणा तयार करीत असून, रशियाची ‘एस-४००’ यंत्रणा त्यातील महत्त्वाचा घटक असेल.

‘प्रादेशिक संपर्कयंत्रणेसाठी रशियाकडून २०० विमाने’

मॉस्को : प्रादेशिक संपर्कयंत्रणा मजबूत करण्यासाठी भारत रशियाकडून विमानांच्या खरेदीसाठी आणि दोनशे विमानांच्या भारतातच निर्मितीसाठी प्रयत्नशील असल्याचे वृत्त रशियाच्या ‘टीएएसएस’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. ‘युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन’चे प्रमुख वदिम बडेखा यांनी २९व्या ‘सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम’च्या पार्श्वभूमीवर ही माहिती दिली. भारत ‘एसजे-१००’ आणि ‘आयएल-११४-३०० टर्बोप्रॉप’ विमानांची खरेदी करण्यास उत्सुक आहे. या विमानांच्या खरेदीसाठी भारताने सर्वप्रथम इच्छा प्रदर्शित केल्याचे ते म्हणाले.

‘मोदी दबावापुढे झुकणार नाहीत’

भारत आणि रशियाचे संबंध मर्यादित ठेवण्याचा पाश्चात्त्य देशांच्या प्रयत्नांमुळे जागतिक स्थैर्याला धोका निर्माण होईल, असा इशारा पुतिन यांनी दिला. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी दबावापुढे झुकणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा विकास झाला असल्याची प्रशंसा त्यांनी केली. भारत-रशिया द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे प्रयत्न असल्याची माहिती पुतिन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.