गेल्या चार वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांच्या शहरांवर भीषण हल्ले करत आहेत. या हल्ल्यात दोन्ही देशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र, तरीही गेल्या चार वर्षांत रशिया आणि युक्रेनमधील युद्धाबाबत कोणताही ठोस तोडगा काढण्यात यश आलेलं नाही. या युद्धाचा दोन्ही देशांवर आणि जगावर देखील गंभीर परिणाम होत आहे.

काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. या सर्व घडामोडीनंतर आता रशिया-युक्रेन युद्धाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे रशियात पोहोचले आहेत.

अमेरिकेचे विशेष दोन प्रतिनिधी रशियात पोहोचल्यानंतर अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी युक्रेनवरील हल्ले पुढील तीन दिवस थांबवण्याचे आदेश दिले आहेत. आता रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी चर्चा होणार आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा होणार

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या अनुषंगाने अमेरिकेकडून पुढाकार घेतला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे रशियात पोहोचले आहेत. आता स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे पुतिन यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे युक्रेन युद्धाबाबत पुतिन यांच्याशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी एक नवीन आणि ठोस प्रस्ताव आपल्याकडे असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी या योजनेचा सविस्तर तपशील जाहीर केलेला नाही. मात्र, त्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यासाठी आता स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे रशिया दौऱ्यावर गेल्याचं सांगितलं जात आहे. ट्रम्प यांनी म्हटलं की, “आमच्याकडे शांततेसाठी एक प्रस्ताव आहे. मी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर या दोन उत्कृष्ट वाटाघाटीकारांना पाठवत आहे. त्यांनी उत्तम काम केलं आहे आणि काहीतरी साध्य करता येईल का? हे पाहण्यासाठी आम्ही त्यांना रशियाला पाठवलं आहे, कदाचित आपण ते साध्य करू शकू अशी शक्यता आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.