Ceasefire between Ukraine-Russia: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर रशिया आणि युक्रेनने ३० दिवस एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याचा चर्चेवर एकमत दर्शविले होते. ट्रम्प आणि पुतिन यांच्यामध्ये मंगळवारी दूरध्वनीवरून दीड ते दोन तास चर्चा झाली. ट्रम्प यांनी सुचविलेला ३० दिवसांचा युद्धविराम प्रस्ताव युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आधीच मान्य केला होता.

रशियाचा युक्रेनवर हल्ला

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले की, रशियाच्या ड्रोन्सनी काल रात्रभर युक्रेनच्या विविध भागांना लक्ष्य केले आहे. तर रशियानेही युक्रेनने ड्रोन हल्ल्याचा आरोप केला आहे. झेलेन्स्की म्हणाले की, आमच्या ऊर्जा प्रकल्पावर हल्ला न करण्याचा निर्णय रशियाने घेतला होता. मात्र त्यांचा निर्णय वास्तवात आलेला नाही. यापुढे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून संघर्ष सुरू आहे. या युद्धाचे परिणाम रशिया, युक्रेनसह संपूर्ण जगावर झाले आहेत. युक्रेन-रशियातील संघर्ष तात्पुरता थांबण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळाले.

युक्रेनने देखली युद्धबंदीबाबत तयारी दर्शवली आहे. तसेच या संदर्भात सौदी अरेबियामध्ये अमेरिका आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांमध्ये काही दिवसांपूर्वी उच्चस्तरीय चर्चाही झाली. आता व्हाईट हाऊस आणि कीव यांच्या संयुक्त निवेदनानुसार, युद्धबंदी प्रस्तावात तात्पुरती युद्धबंदीची तरतूद आहे. जी दोन्ही बाजूंनी मान्य केल्यास वाढवता येऊ शकते. दरम्यान, युक्रेनने याबाबत आपली वचनबद्धता दर्शविलेली आहे.