Vladimir Putin warns Ukraine : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी पुन्हा एकदा युक्रेनला गंभीर इशारा दिला आहे. रशियाला वाटते की युक्रेनला शांततेच्या मार्गाने संघर्ष संपवण्यात फारसा रस नाही, तसेच जर चर्चा अयशस्वी झाली तर रशिया त्यांचे ‘विशेष सैन्य कारवाई’चे ध्येय पूर्ण करण्यासाठी बळाचा वापर करेल, असे पुतिन म्हणाले आहेत.

युक्रेनविरुद्ध रशियन लष्करी कारवाई तीव्र करण्यात आलेली असताना पुतिन यांचे हे विधान आले आहे. ज्यात २७ डिसेंबर २०२५ रोजी कीववर मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि मिसाइल हल्ले करण्यात आले होते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार्‍या महत्त्वाच्या भेटीपूर्वी हे हल्ले करण्यात आले होते.

“आणि जर कीव प्रशासनाला शांततेच्या मार्गाने हे प्रकरण सोडवायचे नसेल, तर आम्ही आमच्यासमोर असलेली सर्व उद्दिष्टे विशेष लष्करी कारवाईदरम्यान लष्करी मार्ग वापरून पूर्ण करू,” असे पुतिन म्हणाल्याचे वृत्त रशियाची सरकारी वृत्तसंस्था टीएएसएसने दिले आहे. तसेच ट्रम्प पुढे म्हणाले की, कीव राजवटीचे (Kyiv regime) चे नेते आजही हा संघर्ष शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याची घाई दाखवत नाहीत.

“आपण आजही पाहातो , दुर्दैवाने कीव रेजिमचे नेते हा संघर्ष शांततेने सोडवण्यासाठी कसल्याही घाईमध्ये नाहीत. मी वर्षभरापूर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात दिलेल्या भाषणात याबद्दल बोललो होतो,” असेही पुतिन म्हणाले.

या वक्तव्यानंतर रशियाने जवळपास ५०० ड्रोन्स आणि ४० क्षेपणास्त्र युक्रेनची राजधानी कीव आणि जवळच्या भागावर डागले. या हल्ल्यात किमान एका नागरिकाचा मृत्यू झाला तर जवळपास २७ जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, १० तास सुरू असलेला हा भडिमार या गोष्टीचे स्पष्ट पुरावा आहेत की, फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने सुरू केलेले हे युद्ध थांबवण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

रशिया-युक्रेन यांच्यात जवळपास चार वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा सुरू असताना, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की रविवारी फ्लोरिडा येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या महत्त्वाच्या बैठकीत सुरक्षेची गॅरंटी आणि प्रादेशिक वाद यासंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे.