लॉस लायनॉस द आँद्रियान : स्पेनच्या कॅनरी बेटांवरील ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून त्याचा लाव्हारस हळूहळू सागराकडे जात आहे दरम्यान प्रादेशिक सरकारने म्हटले आहे की, ज्वालामुखीच्या उद्रेकात कुणीही जखमी झालेले नाही. आतापर्यंत पाच हजार जणांची सुटका करण्यात आली आहे.

 लाव्हारस ला पामा बेटांवरून वाहत असून तो सागरात चालला आहे. त्याचा वेग ताशी ७०० मीटर आहे असे कॅनरी बेटांच्या ज्वालामुखीशास्त्र संस्थेने म्हटले आहे. लाव्हारसाचे दोन प्रवाह तयार झाले असून ते लोकवस्ती नसलेल्या भागात आहेत, अशी माहिती कॅनरी बेटांवरील सरकारचे प्रमुख अँजेल व्हिक्टर यांनी दिली आहे. एकूण वीस घरे या ज्वालामुखी स्फोटात उद्ध्वस्त झाली आहेत. या ज्वालामुखीचा आणखी एक उद्रेक होण्याची शक्यता नाही असे टॉरेस यांनी म्हटले आहे. या ज्वालामुखीच्या स्फोटात वेगवेगळ्या स्वरूपात नुकसान झाले असून प्राणहानी झालेली नाही. ला पामा येथील लोक शेतीवर उपजीविका करतात. स्पॅनिश पंतप्रधान पेड्रोस सँचेझ यांनी सांगितले की, ते सोमवारचा न्यूयॉर्क दौरा रद्द करून ज्वालामुखीग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. ज्वालामुखीचा उद्रेक रविवारी झाला असून आठवडाभर भूगर्भात हालचाली जाणवत होत्या. त्यांचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी केले आहे. कॅनरी बेटांवरील ज्वालामुखीशास्त्र संस्थेने म्हटले आहे की, दुपारी तीन वाजेच्या सुमारास ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून हे ठिकाण बेटाच्या दक्षिणेला आहे. यापूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक १९७१ मध्ये झाला होता. यावेळच्या उद्रेकानंतर लाल ज्वाळा तसेच काळा धूर दिसत होता. ला पामा या भागातील लोकसंख्या ८५ हजार असून ते स्पेनच्या कॅनरी बेटांवरील आठ ज्वालामुखी बेटांपैकी एक आहे. आफ्रिकेच्या पश्चिाम किनारपट्टीजवळ ही बेटे असून मोरोक्कोपासून या बेटांचे अंतर १०० कि.मी आहे.