रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भारतासह जर्मनी, झेक प्रजासत्ताक, नॉर्वे आणि हंगेरीमधील युक्रेनच्या राजदूतांना बडतर्फ केल्याची घोषणा केली. हा निर्णय का घेण्यात आला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर्मनी, भारत, झेक प्रजासत्ताक, नॉर्वे आणि हंगेरीमधील युक्रेनच्या राजदूतांना बडतर्फ करण्याचा आदेश जाहीर करण्यात आला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा उघडपणे विरोध न करणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत रशियाविरोधात मांडलेल्या ठरावावरील मतदानात भारताने भाग घेतला नव्हता.

या राजदूतांना हटवण्यामागे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी कोणतेही कारण दिलेले नाही. या अधिकाऱ्यांवर आणखी कोणती जबाबदारी दिली जाणार आहे, हेही सांगण्यात आलेले नाही. याआधी झेलेन्स्की यांनी जर्मनीबद्दलची नाराजी व्यक्त केली होती. गेल्या आठवड्यात एका मुलाखतीत जर्मनीच्या राजदूताने दुसर्‍या महायुद्धात हिटलर समर्थित नाझींच्या रक्षणार्थ विधान केले होते. मात्र बाकी राजदूतांना का काढण्यात आले याचा खुलासा झालेला नाही.

झेलेन्स्की यांनी पुन्हा दावा केला आहे की, पाश्चात्य देशांच्या मदतीने ते रशियन सैन्याला मागे ढकलतील. २४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धाला चार महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र रशियन सैन्याने अद्याप युक्रेनचा ताबा घेतलेला नाही. त्यांना प्रचंड विरोध होत आहे. दुसरीकडे, युक्रेनमध्ये रशियाचा हल्ला शनिवारीही सुरूच होता. रशियाने मारियुपोल आणि डोनेस्तकसह अनेक शहरांवर बॉम्ब फेकले. डोनेस्तक येथे झालेल्या हल्ल्यात पाच जण ठार तर सात जण जखमी झाले. याशिवाय मध्य युक्रेनमधील दोन शहरांमध्ये रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला.