अमेरिका आणि इराणमधील युद्ध अद्याप पूर्णपणे संपलेलं नसतानाच दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा एकदा भडकण्याची चिन्ह निर्माण झाले आहेत. कारण आज (१७ मे) युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवर मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनने केलेल्या या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
आता रशिया पुन्हा युक्रेनला जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता असून या युद्धाचा जगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, युक्रेनने रशियावर केलेल्या ड्रोन हल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोठं भाष्य केलं आहे. ‘आमची कारवाई पूर्णपणे न्याय्य आहे’, असं सांगत आम्ही रशियनांना युद्ध संपवण्याचा स्पष्ट संदेश देत असल्याचंही झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
व्लादिमीर झेलेन्स्की काय म्हणाले?
युक्रेनने मॉस्कोवर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर व्लादिमीर झेलेन्स्की यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत म्हटलं की, “रशियाने युद्ध लांबवल्यामुळे आणि आमच्या शहरांवर व समुदायांवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आमची कारवाई पूर्णपणे न्याय्य आहे. यावेळी, युक्रेनचे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र हल्ले मॉस्कोपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे आता आम्ही रशियनांना एक स्पष्ट संदेश देत आहोत. त्यांनी त्यांचं युद्ध संपवलंच पाहिजे.”
Our responses to Russia’s prolongation of the war and its attacks on our cities and communities are entirely justified. This time, Ukrainian long-range sanctions reached the Moscow region, and we are clearly telling the Russians: their state must end its war. Ukrainian drone and… pic.twitter.com/BVFJ1BJQ1i
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) May 17, 2026
“युक्रेनियन ड्रोन आणि क्षेपणास्त्र उत्पादक त्यांचं काम सुरू ठेवत आहेत. मी युक्रेनियन सुरक्षा सेवा आणि सर्व युक्रेनियन संरक्षण दलांच्या अचूकतेबद्दल त्यांचं कौतुक करतो. युक्रेनच्या सीमेचं अंतर ५०० किलोमीटरपेक्षा जास्त आहे. मॉस्को प्रदेशात रशियन हवाई संरक्षणाची सर्वाधिक तैनाती आहे. मात्र तरीही आम्ही त्यावर मात करत आहोत. युक्रेनचा विजय असो”, असं व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
One Indian worker has lost his life and three others have been injured in a drone attack in Moscow region earlier today. Embassy officials have visited the location and met the injured workers in the hospital.
— India in Russia (@IndEmbMoscow) May 17, 2026
The Embassy condoles the loss of life and is working with the…
ड्रोन हल्ल्यात एका भारतीय कामगाराचा मृत्यू
रशियातील भारतीय दूतावासाने म्हटलं की, “रविवारी रशियाच्या मॉस्को शहराच्या परिसरात झालेल्या ड्रोन हल्ल्यात एक भारतीय कामगार ठार झाला आहे. तसेच इतर तीन जण जखमी झाले आहेत. येथील अधिकाऱ्यांनी हल्ल्याच्या ठिकाणी भेट दिली असून जखमी कामगारांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.”
रशियाने काय म्हटलं?
“गेल्या २४ तासांत देशभरात १००० हून अधिक युक्रेनियन ड्रोन रोखण्यात आले आहेत”, असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. तसेच मॉस्कोच्या महापौरांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, “हवाई संरक्षण यंत्रणांनी राजधानीच्या दिशेने येणारे किमान ८१ ड्रोन पाडले आहेत. या हल्ल्यांमुळे अनेक भागांतील निवासी इमारती आणि पायाभूत सुविधांचं नुकसान झालं आहे.” तसेच काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “या हल्ल्यात किमान चार जण ठार झाले, ज्यात मॉस्कोतील तिघांचा समावेश आहे.”
रशिया-युक्रेन संघर्षाला चार वर्ष पूर्ण
रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाला जवळपास आता चार वर्ष उलटले आहेत, पण अद्यापही दोन्ही देशातील संघर्ष पूर्णपणे संपलेला नाही. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश सातत्याने एकमेकांच्या शहरांवर हवाई हल्ले करत आहेत. या दोन्ही देशांतील युद्धाचा जगावर देखील मोठा परिणाम होत आहे. रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही. रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष आता पुन्हा एकदा आणखी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत.
भविष्यात संरक्षण सामग्रीमध्ये ड्रोनची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार?
लष्करी इतिहासात पहिल्यांदाच मानवरहित हवाई वाहने पारंपरिक युद्धभूमीवर प्रबळ ठरली. युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांनी या युद्धात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या ड्रोनचा वापर केला. युद्ध सुरू झाल्यापासून अधिकाधिक विकसित ड्रोनने हल्ले करण्यात आले. युद्धसामग्रीच्या या बदलाचे परिणाम गंभीर आहेत. मोठ्या संख्येने जवानांचा माग काढणे या ड्रोनना सहजशक्य आहे, त्यामुळे मनुष्यबळ न गमावता विरुद्ध पक्षाच्या सैनिकांना लक्ष्य करणे शक्य झाले आहे. परिणामी भविष्यात संरक्षण सामग्रीमध्ये ड्रोनची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. आधुनिक युद्धे लहान, अचूक आणि महागड्या, मर्यादित उच्च-तंत्रज्ञानाच्या शस्त्रास्त्रांनी लढली जातील या गृहीतकाला रशिया-युक्रेन युद्धाने छेद दिला आहे.
