युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. युरोपियन युनियनच्या एका परिषदेतील हा व्हिडीओ असल्याची माहिती सांगितली जात आहे. झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियन परिषदेत केलेल्या एका कृतीमुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत, यावरूनच युरोपियन युनियन परिषदेच्या एका नियमाची देखील चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय घडलं?
युरोपियन युनियनच्या एका परिषदेला वोलोदिमीर झेलेन्स्की हे उपस्थित होते. याच परिषदेत आणखी काही देशांचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी देखील उपस्थित होते. मात्र, याच परिषदेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ युरोपियन नेत्यांबरोबरच्या परिषदेदरम्यानचा असून वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा आहे.
झालं असं की, वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीचं झाकण उघडण्याच्या कृतीवरून ते वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. युरोपियन युनियनची परिषद सुरू असतानाच झेलेन्स्की यांनी एका प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीचं झाकण उघडलं आणि ते थोडसं पाणी प्यायले. पण पाण्याच्या बाटलीचं झाकण उघडताना झेलेन्स्की यांनी बाटलीच झाकण एकदम पिळून उघडलं.
तसेच ते बाटलीच झाकण हे बाटलीलाच जोडलेलं ठेवण्याऐवजी त्यांनी ते पूर्णपणे काढून टेबलावर ठेवलं. झेलेन्स्की यांच्याकडून झालेल्या या लहानशा कृतीकडे लगेच कोणाचं लक्ष गेलं नाही. मात्र, त्यानंतर झेलेन्स्की यांच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर यावरून झेलेन्स्की चर्चेच्या केंद्रस्थानी आले. या संदर्भातील वृत्त फर्स्टपोस्टने दिलं आहे.
दरम्यान, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही जणांनी हे निदर्शनास आणून दिलं की, झेलेन्स्की यांची ही कृती तांत्रिकदृष्ट्या युरोपियन युनियनच्या सर्वात प्रसिद्ध पॅकेजिंग नियमांपैकी एका नियमाच्या विरोधात होती. तसेच ही घटना जेव्हा घडली जेव्हा झेलेन्स्की हे प्रादेशिक सुरक्षा आणि संरक्षण सहाय्य या सारख्या मुद्द्यांवर पत्रकारांना संबोधित करत होते.
