पीटीआय, नवी दिल्ली
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार देशभरातील १६ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मंगळवारपासून मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेला सुरुवात होत आहे. या मोहिमेत हजारो अधिकारी थेट मतदारांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत.
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, पंजाब, सिक्कीम, त्रिपुरा, तेलंगणा आणि उत्तराखंड या राज्यांत आणि दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश, चंदीगड आणि दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांमधील ३६.७३ कोटी मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली. यामुळे हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर आणि लडाख वगळता संपूर्ण देशात ‘एसआयआर’ प्रक्रिया पार पडणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात ३.९४ लाखांपेक्षा अधिक मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ) ३६.७३ कोटी मतदारांच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत. त्यांच्या सहाय्यासाठी राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले ३.४२ लाख मतदानकेंद्र प्रतिनिधी (बीएलए) असणार आहेत. ‘एसआयआर’ प्रक्रियेत ‘बीएलओ’ प्रत्येक मतदाराला दोन गणना फॉर्म देणार आहेत. मतदारांनी त्यातील माहिती भरून एक प्रत स्वतःकडे ठेवायची असून दुसरी प्रत ‘बीएलओ’कडे जमा करायची आहे. ही माहिती ऑनलाइनही सादर करता येणार आहे. बंद आढळलेल्या घरांना ‘बीएलओ’ किमान तीन वेळा भेट देणार आहेत.
अशी असेल प्रक्रिया
३० जून ते २९ जुलै : घराघरांत जाऊन माहिती संकलन
५ ऑगस्ट : प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर : हरकती व दावे दाखल करण्याची मुदत
५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर : हरकतींची छाननी व निर्णय
७ ऑक्टोबर : अंतिम मतदारयादी प्रसिद्ध
काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरणाची मागणी
बंगळुरू : ‘एसआयआर’ प्रक्रियेला विरोध नाही, मात्र मतदारांची नावे वगळण्यापूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रिया पाळल्या जाव्यात, तसेच काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खरगे यांनी केली आहे. खरगे म्हणाले की, मतदार यादी अचूक ठेवणे हा निवडणूक आयोगाचा अधिकार आणि जबाबदारी आहे. मात्र, केवळ नावातील किंवा स्पेलिंगमधील किरकोळ चुका असल्यामुळे कोणाचाही मतदानाचा अधिकार हिरावला जाता कामा नये.
