नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने २०२६ साठी १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये पाच पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व्ही. एस. अच्युतानंदन तसेच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला.
सार्वजनिक क्षेत्रात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के. टी. थॉमस, कला क्षेत्रात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व व्हायोलिनवादनातील ज्येष्ठ कलाकार एन. राजम, तर साहित्य व शिक्षण क्षेत्रात मल्याळम पत्रकार पी. नारायणन यांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आला आहे. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, पार्श्वगायिका अल्का याज्ञिक, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी, ज्येष्ठ अभिनेते ममूटी आणि बँकर उदय कोटक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
जाहिरात क्षेत्रातील दिग्गज पीयुष पांडे, झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन आणि भाजप नेते व्ही. के. मल्होत्रा यांनाही पद्मभूषण जाहीर झाला आहे. अभिनेते व विनोदी कलाकार सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री देण्यात येणार आहे. या वर्षीच्या पद्म पुरस्कार यादीत ९० महिला असून, परदेशी नागरिक, अनिवासी भारतीय, भारतीय वंशाचे परदेशी नागरिक आणि भारतीय नागरिकत्व असलेले परदेशस्थित या प्रवर्गातील सहा व्यक्तींचा समावेश आहे. तसेच १६ पुरस्कार मरणोत्तर देण्यात येणार आहेत.
टेनिसपटू विजय अमृतराज यांना पद्मभूषण, तर क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि हॉकीपटू सविता पुनिया यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. याशिवाय, माजी जेएनयू कुलगुरू एम. जगदीश कुमार, माजी प्रसार भारती मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेमपाटी, तसेच अभिनेते आर. माधवन आणि प्रोसेनजित चॅटर्जी यांचाही पद्मश्री पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे.
