मध्य प्रदेशातील ‘व्यापमं’ घोटाळ्यातील २५ आरोपी आणि साक्षीदारांचा मृत्यू नैसर्गिक होता, असे स्पष्ट  करून गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी सोमवारी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावली.
विरोधी पक्षाने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची नव्याने मागणी केल्यानंतर हे मृत्यू नैसर्गिक असल्याचे कारण देत गौर यांनी मागणी सपशेल फेटाळली. आरोपी आजारी पडला आणि त्यामध्ये मरण पावला, लसर्व मृत्यू नैसर्गिक होते, असे ते म्हणाले.
या घोटाळ्यातील दोन आरोपींचा ग्वाल्हेर आणि इंदूरमध्ये मृत्यू झाल्याने प्रकरणाला नवे वळण लागले आहे. आतापर्यंत २५ आरोपी आणि साक्षीदारांचा मृत्यू झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयानेही सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली आहे. सध्या या घोटाळ्याचा तपास मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे, त्यामुळे सीबीआय चौकशी गरजेची नाही, असे गौर म्हणाले.
प्रकृती अचानक खालावल्याने ग्वाल्हेरच्या बिर्ला हॉस्पिटलमध्ये डॉ. राजेंद्र आचार्य (४०) यांचा रविवारी मृत्यू झाला तर नरेंद्रसिंह तोमर (२९) हा इंदूरच्या कारागृहात गूढरीत्या मरण पावला. सदर घोटाळ्यातील २३ आरोपी, साक्षीदार यांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याचे या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या विशेष पथकाने तीन दिवसांपूर्वी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात स्पष्ट केले होते.
‘व्हिसलब्लोअर’चीही मागणी
मध्य प्रदेशच्या गाजलेल्या व्यापम घोटाळ्यातील आरोपी व साक्षीदार यांच्या रहस्यमय परिस्थितीतील मृत्यूंचा सीबीआयने तपास करावा, असे हा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे.
सर्व आरोपी या किंवा त्या आजाराने मरण पावत आहेत, हा काही योगायोग नाही. यामागे दिसते त्यापेक्षा अधिक काही तरी आहे, असे हा घोटाळा सर्वप्रथम उघड करणारे न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तज्ज्ञ प्रशांत पांडे यांनी सांगितले. या घोटाळ्याचा ‘व्हिसलब्लोअर’ झाल्यानंतर आपल्याला स्वत:च्या जिवाला धोका असल्याचे वाटत असल्याचे ते म्हणाले.
राज्य सरकारमधील उच्चपदस्थ व प्रभावी लोक हा घोटाळा दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे राज्याच्या हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्र संस्थेमार्फत या घोटाळ्याचा तपास व्हावा, अशी अपेक्षा पांडे यांनी व्यक्त केली.
मध्य प्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांचा मुलगा शैलेश याच्यासह आरोपी व साक्षीदार मिळून या घोटाळ्यातील एकूण २५ जण आतापर्यंत मरण पावले आहेत.

काँग्रेसकडून सीबीआय तपासाची मागणी
मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या ‘व्यापमं’ घोटाळ्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने सोमवारी केली. या घोटाळ्यात आरोपी व साक्षीदार मिळून ४३ जण संशयास्पद परिस्थितीत मरण पावले असल्याचा दावा पक्षाने केला.‘व्यापमं’ घोटाळा हा स्वतंत्र भारतातील सर्वात मोठय़ा घोटाळ्यांपैकी एक असून, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एका स्वतंत्र विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) त्याचा तपास व्हायला हवा, असे पक्षाचे प्रवक्ते टॉम वडक्कन म्हणाले.राजकीय नेते, नोकरशहा आणि दलाल यांचा संबंध असलेला ‘व्यापमं’ हा प्रवेश आणि नोकरभरती यांच्याशी संबंधित फार मोठा घोटाळा आहे. माजी शिक्षणमंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांच्यासह काही अधिकारी आणि उमेदवार यांना या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
काँग्रेसने तर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हेही या गुन्ह्य़ात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नेमलेल्या एसआयटीच्या देखरेखीखाली मध्य प्रदेश पोलिसांचे विशेष कृतीदल या घोटाळ्याचा तपास करत आहे.