भारत महिला रोबोट पाठवणार अवकाशात
मिशन गगनयानमध्ये महिला अंतराळवीराचा समावेश नसला तरी, महिला रोबोट मात्र अवकाशात जाणार आहे. १५ ऑगस्ट २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून केलेल्या भाषणात मिशन गगनयानची घोषणा केली होती. ‘व्योममित्रा’ असे या महिला रोबोटचे नाव असून, ती माणसाप्रमाणे अवकाशात वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी सक्षम आहे.
व्योममित्रा दोन वेगवेगळया भाषांमध्ये बोलू शकते. मागच्यावर्षी जानेवारी २०१९ मध्ये इस्रो मानवी रोबोट अवकाशात पाठवणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम समोर आले होते. “आम्ही माणसाला अवकाशात पाठवून त्याला पृथ्वीवर सुरक्षित परत आणू शकतो या पलीकडे जाऊन या मोहिमेचे उद्दिष्टयपूर्ण झाले पाहिजे” असे इस्रोचे अध्यक्ष के.सिवन म्हणाले होते.
“आमचा रोबोट मानवाप्रमाणे असेल. माणूस जे करतो, ते सर्व आमचा रोबोट सुद्धा करेल. आमचे पहिले अवकाश विमान रिकामी जाणार नाही. आम्ही शक्य तितका उपयोग करुन घेऊ” असे सिवन म्हणाले. मिशन गगनयानसाठी चार अंतराळवीरांची निवड झाली असून, रशियामध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरु आहे.