रिटेल उद्योग क्षेत्रातील आघाडीची अमेरिकन कंपनी वॉलमार्टने ई-कॉमर्स क्षेत्रातील भारतातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सा विकत घेण्याची घोषणा केली आहे. या सौद्यांमुळे फ्लिपकार्टमधील काही माजी आणि विद्यमान कर्मचारी कोट्याधीश होणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांकडे फ्लिपकार्टचे शेअर्स आहेत त्यांच्या संपत्तीमध्ये घसघशी वाढ होणार आहे.

फ्लिपकार्टच्या ३ हजार कर्मचाऱ्यांकडे कंपनीचे शेअर्स आहेत. यामध्ये माजी आणि विद्यमान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. फ्लिपकार्टमधील एकूण कर्मचारी संख्या १० हजार आहे. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि सीईओ बिन्नी बन्सल यांनी कर्मचाऱ्यांकडे असलेल्या शेअर्सचे १०० टक्के बायबॅक करणार असल्याची घोषणा केल्यानंतर कर्मचारी टाऊन हॉलमध्ये बुधवारी उत्साह दिसून आला.

बायबॅकमध्ये ऑफर म्हणजे कंपनीच ते शेअर्स विकत घेईल. या बायबॅक ऑफरमध्ये प्रतिशेअरला १५० डॉलर म्हणजे १० हजार रुपये मुल्य मिळू शकते असे सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले. फोनपेचे संस्थापक आणि सीईओ समीर निगम, माजी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आमोद मालवीय, ऑपरेशन्स विभागाचे माजी अध्यक्ष सुजीत कुमार, अंकित नागोरी, मुकेश बन्सल हे भारतीय या सौद्यामुळे कोट्याधीश बनणार आहेत.

वॉलमार्ट फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सा 16 अब्ज डॉलर्सना (सुमारे एक लाख कोटी रुपये) विकत घेणार आहे. भारतामध्ये असलेल्या संधीचा विचार करता ही बाजारपेठ जगातल्या सगळ्यात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. भारतातल्या ई-कॉमर्सच्या बाजारपेठेमध्ये आमूलाग्र परीवर्तन घडवणाऱ्या फ्लिपकार्टमध्ये भागीदारी मिळण्याची संधी आमच्यासाठी महत्त्वाची आहे, अशी भावना वॉलमार्टचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांनी व्यक्त केली आहे.

वॉलमार्ट आणखी दोन अब्ज डॉलर्स किंवा 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक फ्लिपकार्टमध्ये करणार आहे. फ्लिपकार्ट विकत घेण्यासाठी वॉलमार्टची प्रतिस्पर्धी कंपनी असलेली अॅमेझॉनही स्पर्धेत होती. परंतु फ्लिपकार्टनं वॉलमार्टला पसंती दिली. तज्ज्ञांच्या मते ई-कॉमर्स क्षेत्रामधलं दुसरी कंपनी ताब्यात घेण्याच्या बाबतीत हे जगातलं सगळ्याच मोठं डील आहे.