CV Shanmugam Nayanthara Controversy News: तमिळनाडूमध्ये एप्रिल महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता वेग घेत आहे. द्रमुक पक्षाला सत्तेतून बाजूला करण्यासाठी इतर पक्ष प्रयत्नात आहेत. अण्णाद्रमुक हा द्रमुकचा प्रमुख विरोधक आहे. तर अभिनेता थलपती विजयच्या टीव्हीके पक्षाचेही आव्हान आहे. अशातच दोन्ही विरोधी पक्षांकडून टीव्ही अभिनेत्रींवर वादग्रस्त विधान येत आहेत. अण्णाद्रमुक पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री आणि खासदार सीव्ही षण्मुगम यांनी आज अभिनेत्री नयनताराबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे वाद उफाळला.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याविरोधात महिला सुरक्षेसंदर्भात आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झाले असताना षण्मुगम यांनी स्टॅलिन यांना लक्ष्य करत असताना अभिनेत्री नयनताराविषयी लैंगिक भेदभावाची आणि अपमानास्पद अशी टिप्पणी केली.

मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी अलीकडेच तमिळ जनतेला आवाहन करताना त्यांची काय स्वप्ने आहेत, हे सांगावे, असे आवाहन केले होते. जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असा शब्द स्टॅलिन यांनी दिला होता. महिला सुरक्षासंदर्भातील आंदोलनात षण्मुगम यांनी स्टॅलिन यांच्या या विधानाचा समाचार घेताना अभिनेत्री नयनतारा यांचा उल्लेख केला.

नयनतारा यांच्याबद्दलचे नेमके विधान काय?

खासदार षण्मुगम म्हणाले, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी आपल्याला स्वप्न पाहायला शिकवले. तर स्टॅलिन यांनी आपली स्वप्ने सांगावीत असे म्हटले. जर मी म्हणालो की, मला नयनतारा हवी आहे. तर ते (स्टॅलिन) माझे स्वप्न पूर्ण करणार का? जर कुणी म्हटले की, त्याला नयनताराबरोबर लग्न करायचे आहे, तर ते (स्टॅलिन) त्याचे स्वप्न पूर्ण करणार का?

षण्मुगम यांच्या विधानावर आता चौफेर टीका होत आहे. इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही यावर टीका केली आहे. एक्सवरील एका युजरने यावर टीका करताना म्हटले, महिलांच्या सुरक्षेसाठी आयोजित केलेल्या आंदोलनात त्यांनी महिलांबद्दलच इतक्या घाणेरड्या पद्धतीने विधान केले. यावरून त्यांचे चारित्र्य दिसून येते. तर वनिता नावाच्या आणखी युजरने म्हटले की, ते (षण्मुगम) त्यांच्या खिशात महिला नेत्या जे. जयललिता यांचा फोटो मिरवतात. पण त्यांचे बोलणे महिलांना सन्मान देणारे नाही.

द्रमुक पक्षाची टीका

द्रमुक पक्षाने षण्मुगम यांच्या विधानावर जोरदार टीका केली आहे. पक्षाचे प्रवक्ते सरवनन अण्णादुराई म्हणाले, हे विधान अतिशय घाणेरडे आणि आक्षेपार्ह असे आहे. षण्मुगम यांनी याबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे, अण्णाद्रमुक पक्षाने महिला सुरक्षेसाठी आंदोलन छेडले होते. या आंदोलनात महिलांच्या समोर तुम्ही कसे काय असे विधान करू शकता? सीव्ही षण्मुगम असे कृत्य वारंवार करत आले आहेत.

प्रवक्ते सरवनन अण्णादुराई पुढे म्हणाले, महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही. अण्णाद्रमुक पक्षाचे नेते इ. पलानीस्वामी कुठे आहेत आता? सीव्ही षण्मुगम यांना रोखण्याची त्यांच्यात हिंमत आहे का? जर पलानीस्वामी खरोखर पक्षाचे नेते असतील आणि महिलांच्या सुरक्षेबद्दल त्यांना काळजी वाटत असेल तर त्यांनी सीव्ही षण्मुगम यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले.