अग्निपथ योजनेवरून देशातील बहुतांश भागात गदारोळ सुरू आहे. यात भाजपा नेते सातत्याने अग्निपथ योजनेचे फायदे मोजण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत इंदौरमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला आहे. भाजपा कार्यालयात आम्ही सुरक्षा रक्षक ठेवण्यासाठी अग्निवीरांना प्राधान्य देऊ, असे कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.

बिहार आणि उत्तर प्रदेशनंतर आता मध्य प्रदेशातही अग्निपथ योजनेवरून गदारोळ सुरू आहे. इंदौरमध्ये लष्कर भरतीच्या उमेदवारांनी दोन दिवसांपासून सतत गोंधळ घातला आहे. रविवारी कैलाश विजयवर्गीय माध्यमांशी संवाद साधण्यासाठी इंदौरमधील भाजपा कार्यालयात पोहोचले होते. याबाबत कैलाश विजयवर्गीय यांना विचारले असता त्यांनी सर्वप्रथम अग्निपथ योजनेचे फायदे सांगितले. त्यानंतर अग्निवीर म्हणून काम केल्यानंतर बाहेर पडल्यावर १३ लाख रुपये मिळतील, असे सांगितले. तसेच भाजपा कार्यालयात सुरक्षा ठेवली तर येथेही अग्निवीरांना प्राधान्य देऊ, असे कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले.

विश्लेषण: ‘अग्निपथ’ योजनेला तरुणांचा विरोध का? देशभरात हिंसक आंदोलनं का होत आहेत?

“अमेरिका, चीन आणि फ्रान्समध्ये लष्करात कंत्राटी पद्धतीने भरती केली जाते. आपल्याकडे सैन्यातून निवृत्तीचे वय जास्त आहे. ते कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जेव्हा अग्निवीर ही पदवी घेऊन सैन्यातून निवृत्त होईल आणि मला या भाजपा कार्यालयात सुरक्षारक्षक ठेवायचा असेल, तर मी अग्निवीरलाच प्राधान्य देईन,” असे कैलास विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.

“आम्हाला सैन्य भाड्याने नको”; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा ‘अग्निपथ’ योजनेवर हल्लाबोल

कैलास विजयवर्गीय यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने अग्निपथबद्दलच्या सर्व शंका भाजपाच्या कैलाश विजयवर्गीय यांनी दूर केल्या. हा सत्याग्रह या मानसिकतेविरुद्ध आहे, असे म्हटले आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून देशातील तरुण आणि लष्कराच्या जवानांचा इतका अनादर करू नका, असे म्हटले आहे. “आपल्या देशातील तरुण रात्रंदिवस परिश्रम करून शारीरिक परीक्षा उत्तीर्ण होतात कारण त्यांना सैन्यात भरती होऊन आयुष्यभर देशसेवा करायची आहे, भाजपा कार्यालयाबाहेर पहारेकरी व्हायचे आहे म्हणून नाही,” असेही केजरीवाल म्हणाले.