Waqf Bill : लोकसभेत सध्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर चर्चा सुरु आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष यांसह तमाम विरोधी पक्षांनी या विधेयकाला थेट विरोध केला आहे. हे विधेयक संविधान विरोधी आहे असंही विरोधकांनी म्हटलं आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनी ही मागणी केली आहे की सौगात ए मोदी मध्ये मुस्लिमांना काही द्यायचं असेल तर हे विधेयक आम्हाला द्या.
इमरान मसूद काय म्हणाले?
“बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आमच्या अधिकार आणि हक्क यांचं रक्षण करण्याचं काम केलं आहे. वक्फ सुधारणा विधेयक आणून हे सरकार तो अधिकार आणि हक्क हिरावून घेतं आहे. ज्यांनी या विधेयकाचा मसुदा तयार केला त्यांना याबाबतची काहीही माहिती नाही. जी समिती नेमली गेली होती त्यात एकही मुस्लिम स्कॉलर नव्हता. वेगवेगळ्या राज्यांच्या बोर्डांनी सच्चर समितीपुढे हे सांगितलं की अशा अनेक मालमत्ता आहेत ज्यावर सरकारने कब्जा केला आहे. नवा कायदा लागू झाल्यानंतर त्यांवरचा वक्फचा दावा संपुष्टात येईल. उत्तर प्रदेशात १४ हजार एकरपैकी ११ हजार ५०० एकर जमीन सरकारी असल्याचं घोषित केलं आहे. ज्या जमिनींवर मशिदी, कब्रस्तान आहेत.”
१२ बिगर मुस्लिम सदस्य असणार म्हणजे बहुमत त्यांच्याकडेच
यापुढे इमरान मसूद असं म्हणाले की, “विधेयकानुसार वक्फ बोर्डात २२ पैकी १० मुस्लिम सदस्य असतील १२ बिगर मुस्लिम सदस्य असतील. याचाच अर्थ काहीही निर्णय घ्यायचा असेल तर बिगर मुस्लिमांकडे बहुमत असेल. इतर धर्मांच्या विश्वस्त मंडळात बिगर धर्माच्या लोकांना सहभागी का करुन घेतलं जात नाही?” सरकारने या विधेयकाचा आधार घेऊन वक्फ मालमत्तेशी संबंधित खटल्यांसाठी मार्ग खुला केला आहे. हे विधेयक संविधान विरोधी विधेयक आहे. अनुच्छेद १४, १६ आणि २५ चा भंग करणारं हे विधेयक आहे. सौगात ए मोदीची चर्चा सध्या सुरु आहे. आम्हाला त्यामध्ये शिक्षण आि रोजगार द्या आणि वक्फचा हा कायदाही द्या. असंही इमरान मसूद यांनी म्हटलं आहे.
मी रामाचा वंशज आहे मला मंदिर प्रशासनाच्या विश्वस्त समितीत सहभागी करुन घ्या
इमरान मसूद म्हणाले वक्फ बोर्डातील २२ सदस्यांपैकी १२ बिगर मुस्लिम असतील. त्यांना वक्फबाबत काय माहिती असेल? जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या अंतिम क्षणी दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत त्याची जमीन वक्फला दिली असेल तर तिला वक्फची जमीन म्हणून मंजुरी मिळणार नाही. कारण सरकार या विधेयकाद्वारे फक्त लिखित वक्फला मान्यता देतं आहे. १२ जण बिगर मुस्लिम असतील तर माझीही ही मागणी आहे की मी प्रभू रामचंद्रांचा वंशज आहे मला मंदिराच्या विश्वस्त मंडळात सहभागी करुन घ्या. जर कुणाला वाटत असेल की मी रामाचा वंशज नाही तर मी ही बाब सिद्ध करायलाही तयार आहे.