scorecardresearch

युक्रेनवरील हल्ले तीव्र करण्याचा इशारा; काळ्या समुद्रात मुख्य युद्धनौका बुडवल्याने रशिया संतप्त 

युक्रेनने प्रमुख युद्धनौका बुडवल्यानंतर आक्रमक झालेल्या रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनची राजधानी किव्हवरील क्षेपणास्त्र हल्ले आणखी तीव्र करण्याचा इशारा शुक्रवारी दिला.

वृत्तसंस्था, किव्ह : युक्रेनने प्रमुख युद्धनौका बुडवल्यानंतर आक्रमक झालेल्या रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनची राजधानी किव्हवरील क्षेपणास्त्र हल्ले आणखी तीव्र करण्याचा इशारा शुक्रवारी दिला. काळय़ा समुद्रातील युद्धनौकांच्या ताफ्यातील प्रमुख युद्धनौका गमावल्याने रशियाला एका प्रतीकात्मक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे संतापलेल्या रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनच्या रशियन भूभागावरील कथित लष्करी कारवाईविरोधात आक्रमक होण्याची धमकी दिली.

युक्रेन सीमेलगतच्या ब्रायन्स्क या प्रांतावरील युक्रेनच्या हवाई हल्ल्यात सात नागरिक जखमी झाल्याचा आणि सुमारे १०० निवासी इमारतींचे नुकसान झाल्याचा आरोप रशियन अधिकाऱ्यांनी केला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने आता युक्रेनच्या राजधानीवरील क्षेपणास्त्र हल्ल्यांची तीव्रता वाढवण्याचा इशारा दिला आहे. युक्रेन सीमा भागातील अधिकाऱ्यांनी युक्रेनने केलेल्या हल्ल्याची माहिती गुरुवारी दिली होती. रशियन सैन्य किव्ह शहर काबीज करण्यात अयशस्वी ठरल्यानंतर आणि पूर्व युक्रेनवरून काहीशी माघार घेण्यात आल्यानंतर राजधानी किव्हमध्ये जनजीवन युद्धपूर्व स्थितीत येत असल्याची काही लक्षणे दिसली होती. परंतु आता रशियाच्या ताज्या धमकीमुळे किव्हमधील रहिवाशांना पुन्हा हवाई हल्ल्यांच्या सायरनसरशी भुयारी रेल्वे स्थानकांमध्ये आश्रय घ्यावा लागेल, अशी चिन्हे आहेत.

रशियाकडून प्रथमच दीर्घ पल्ल्याच्या अस्त्रांचा वापर

मारियूपोलवर हल्ला करण्यासाठी रशियाने दीर्घ पल्ल्याची बाँम्बवाहू क्षेपणास्त्रे वापरल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनच्या संरक्षण खात्याचे प्रवक्ते ओलेक्सान्डर मोतुझियान्क यांनी शुक्रवारी सांगितले की, रशियाने युक्रेनवरी आक्रमण केल्यापासून पहिल्याच वेळी रशियाने या दीर्घ पल्ल्याच्या बाँम्बवाहक अस्त्रांचा वापर केला आहे. सध्या या मारियूपोल शहरात रस्त्यावर लढाई सुरू असून त्यामुळे तेथील स्थिती बिकट झाली आहे. लढाई सुरू असलेल्या भागातच पोलाद उत्पादनाचे कारखाने आहेत.  रुबिझ्न्हे, पोपास्ना आणि मारियूपोल ही शहरे ताब्यात घेण्याची व्यूहरचना रशियाने केली आहे, असा दावा त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Warnings intensify attacks ukraine russia angry sinking warship black sea ysh