शेतकऱ्यांनी भारत बंद पुकारलेला असताना आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री व पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप केला होता. हा मुद्दा दिवसभर दिल्लीसह राष्ट्रीय राजकारणात चर्चेत होता. दिल्ली पोलिसांनी मात्र, आपकडून करण्यात आलेला आरोप फेटाळून लावला होता. अखेर आपकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर पोलिसांनी फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून खुलासा केला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने मंगळवारी केला. सिंघू बॉर्डरवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतल्यापासून तसेच भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासूनच दिल्ली पोलिसांनी त्यांना घरात नजरकैदेत ठेवल्याचा दावा आपने केला होता. दिल्ली पोलिसांनी  हा आरोप फेटाळून लावला होता. त्यानंतरही आपकडून आरोप होत असल्यानं पोलिसांनी एक व्हिडिओ पोस्ट करत अरविंद केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवले नसल्याचं स्पष्ट केलं. मंगळवारी रात्री मात्र केजरीवाल यांनी एका पंचातारिक हॉटेलमध्ये लग्नाला हजेरी लावल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं आहे.


उत्तर दिल्लीचे पोलीस उपायुक्तांनी केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवल्याचा हा दावा चुकीचा असल्याचे सांगत त्यांच्या घराबाहेरील फोटो ट्विट केला होता. त्यानंतर केजरीवाल हे आपल्या घराबाहेर पडत असतानाचे एक फुटेज समोर आले. दुसऱ्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री ९.२५ वाजता पश्चिम विहारमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका लग्नासाठी जात असताना दिसत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

आपचे आमदार आणि समर्थक केजरीवाल यांची निवासस्थानी भेट घेण्यासाठी जात असताना असलेल्या पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आले. तसेच कोणत्याही प्रकारची खोटी माहिती न पसरवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं होतं. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार केजरीवाल यांच्या घराच्या बाहेर तैनात करण्यात आलेले पोलीस हे त्यांच्या नियमित सुरक्षेसाठी होते. याआधीही केजरीवाल यांच्या घराबाहेर बॅरिकेट्स लावण्यात आले होते. सोमवारपासून पक्षाच्या आमदारांसह आप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने तेथे जमण्यास सुरवात केली केली. त्यानंतर महापौर आणि तीन नगरसेवकांसह इतरांनी सोमवारी घराबाहेर आंदोलन सुरू केले. जेव्हा आप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आणि निषेध करण्यास सुरूवात केली, तेव्हा तेथे पुन्हा बॅरिकेट्स लावण्यात आले, असं पोलिसांनी म्हटलं आहे.