मला भाजपात प्रवेश करण्यासाठी पैशांची ऑफर दिली होती; आमदार श्रीमंत पाटील

काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते, असं भाजपचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी रविवारी सांगितलं.

shrimant-patil1
आमदार श्रीमंत पाटील (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते, असं भाजपचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी रविवारी सांगितलं. मात्र “मी भाजपची पैशांची ऑफर न घेता पक्षात आलोय. मला पैसे नकोय, तर मला केवळ मंत्रीपद पाहिजे होतं. मात्र, मागणी करूनही मला मंत्रीपद देण्यात आलं नाही,” असंही पाटील म्हणाले.

“मी मला दिलेली पैशांची ऑफर न घेता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मला प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले गेले होते. त्यावेळी मला पाहिजे तेवढे पैसे मागता आले असते. मात्र, मी पैशांची मागणी केली नाही. मी लोकांची सेवा करण्यासाठी मंत्रीपदाची मागणी केली होती,” असंही पाटील यांनी म्हटलंय. “मला माहित नाही की मला सध्याच्या सरकारमध्ये मंत्रीपद का दिले गेले नाही. पण पुढील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद देण्यात येईल, असं आश्वासन मला देण्यात आलंय. यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी माझं बोलणं झालंय,” असंही पाटील यांनी सांगितलं.

श्रीमंत पाटील हे कर्नाटकातील कागवाड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते काँग्रेस आणि जनता दल-सेक्युलर (जेडीएस) मधून भाजपमध्ये सामील झालेल्या १६ आमदारांपैकी एक होते. या आमदारांनी पाठिंबा काढून घेत भाजपात प्रवेश केल्याने तत्कालीन मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळले होते.

दरम्यान, राज्यात येडियुरप्पा सरकार स्थापन झाल्यानंतर पाटील यांना मंत्रिपद देण्यात आले होते. परंतु, बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. उद्यापासून कर्नाटक विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे पक्षांतर केलेल्या आमदारांनी अधिवेशनात नाराजी व्यक्त करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Was offered money to join bjp in 2019 claims former minister shrimant patil hrc

ताज्या बातम्या