BSF Jawan Purnam Kumar Shaw: पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीएसएफचे जवान पूर्णम कुमार शॉ यांनी चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यामुळे पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले होते. तब्बल २१ दिवसांनी त्यांची सुटका करण्यात आली. या २१ दिवसांत पाकिस्तानने त्यांना कशी वागणूक दिली? त्यांना काय प्रश्न विचारले, याची सर्व माहिती पूर्णम कुमार शॉ यांनी आता दिली आहे.

पाकिस्तानच्या तावडीतून २१ दिवसांनी सुटल्यानंतर पूर्णम कुमार शॉ यांनी फोनवरून कुटुंबियांशी संवाद साधला. त्यांना पाकिस्तानात कोणत्या यातना सहन कराव्या लागल्या याची माहिती त्यांनी दिली. पंजाबच्या फिरोजपूर येथे सीमेवर गस्त घालत असताना २३ एप्रिल रोजी शॉ चुकून आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे गेले होते.

पूर्णम शॉ यांच्याशी फोनवर संवाद साधल्यानंतर त्यांच्या पत्नीने या संभाषणाची माहिती टाइम्स ऑफ इंडियाला दिली. तसेच या प्रसंगानंतरही खचून न जाता पूर्णम कुमार शॉ सैन्यात सेवा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मानसिक छळ केला

पूर्णम शॉ यांच्या पत्नीने सांगितले की, पूर्णम कुमार शॉ यांचा शारीरिक छळ झाला नसला तरी त्यांना रोज रात्री मानसिक त्रास दिला जात होता. शॉ हे सीमेवर सुरक्षा पुरविणारे जवान असूनही त्यांना एका गुप्तहेराप्रमाणे वागणूक दिली गेली. तसेच २१ दिवसांत त्यांना तीन वेगवेगळ्या ठिकाणी हलविण्यात आले होते. एक ठिकाण तर हवाई दलाच्या तळानजीक होते. तिथून रोज विमानांचे आवाज येत असल्याची माहितीही शॉ यांनी दिली असल्याचे पत्नीने सांगितले.

पूर्णम शॉ यांना वेळेवर जेवण दिले जात होते, मात्र त्यांना दात घासू दिले नाहीत, असेही त्यांच्या पत्नीने सांगितले. तसेच शॉ खूप थकलेले वाटत होते, त्यांना बरेच दिवस झोप मिळालेली नाही, असे वाटत आहे. जर पूर्णम शॉ यांना येत्या काही दिवसांत सुट्टी मिळाली नाही तर त्यांना भेटण्यासाठी पठाणकोटला जाणार असल्याचे पत्नी रजनी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी (१४ मे) सायंकाळी अटारी वाघा सीमेवर पाकिस्तानने पूर्णम शॉ यांना सोडले होते. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच पाकिस्तानमध्ये त्यांच्याबरोबर काय झाले? याची चौकशीही करण्यात आली. मात्र ते पाकिस्तानच्या ताब्यात असेपर्यंत त्यांचे कुटुंबिय मात्र तणावाखाली होते.