“निवडणुकांमधून मोदींचा जनाधार कमी झाल्याचच सूचित झालंय”, वॉशिंग्टन पोस्टमधून पंतप्रधान मोदींवर निशाणा!

नुकत्याच झालेल्या निवडणुकांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वॉशिंग्टन पोस्टमधून टीका

PM-Narendra-Modi
(संग्रहित छायाचित्र)

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम ही चार राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात झालेल्या मतदानाचे निकाल रविवारी समोर आले. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपाला मोठा झटका बसला असून तृणमूल काँग्रेसने २०० हून जास्त जागांवर विजय मिळवला आहे. तसेच, केरळ आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये देखील भाजपाला फारशी चमक दाखवता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकन वृत्तपत्र असलेल्या वॉशिंग्टन पोस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. “भारत करोनाचा सरवाधिक फटका बसलेला देश ठरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभा घेऊन चुकीचा संदेश दिला. याबद्दल त्यांच्यावर अनेक तज्ज्ञांनी टीका देखील केली आहे. पण नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला करावा लागलेला पराभवाचा सामना हा या करोना काळात मोदींचा जनाधार कमी झाल्याचंच सूचित करत आहे”, असं वॉशिंग्टन पोस्टने म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये ‘ममता’राज!

पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या जागा मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्या, तरी अब की बार २०० पार मात्र भाजपाला जमलेलं नाही. पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचच सरकार येणार असल्यामुळे भाजपाच्या अनेक दिग्गजांनी केलेला प्रचार पक्षाच्या कामी न आल्याचंच दिसून येत आहे. त्यासोबतच मेट्रो मॅन इ. श्रीधरन यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करण्याचा डावही भाजपाला केरळमध्ये विजय मिळवून देऊ शकला नाही. तर तामिळनाडूमध्येही भाजपाला फारशी प्रगती करता आलेली नाही. त्यामुळे करोना काळात प्रचंड चर्चा आणि प्रचार झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला आसाम आणि पुद्दुचेरी स्वत:कडेच राखण्यावर समाधान मानावं लागलं आहे.

रुग्णवाढीला निवडणुका कारणीभूत!

दरम्यान, यावरून वॉशिंग्टन पोस्टमध्ये मोदींवर चांगलंच तोंडसुख घेण्यात आलं आहे. “देशाची कमजोर आरोग्य व्यवस्था करोनाच्या दुसऱ्या लाटेनं खिळखिळी केलेली असतानाच भारतात ४ राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात निवडणुका घेण्यात आल्या. त्यावर बऱ्याच तज्ज्ञांनी आक्षेप घेतला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने देखील निवडणूक काळात झालेल्या रुग्णसंख्या विस्फोटाला निवडणूक आयोग जबाबदार असल्याची टिप्पणी केली होती”, असं वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

करोनाच्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार; मद्रास हायकोर्टाने फटकारलं

मोदींच्या सभांना हजारोंची गर्दी!

“गेल्या महिन्याभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक मोठमोठ्या प्रचारसभा घेतल्या. या प्रचारसभांना पश्चिम बंगालमधल्या हजारो, लाखो लोकांनी उपस्थिती लावली होती. एक महिला नेतृत्व करत असलेल्या पक्षासोबत मोदींचा पक्ष असलेल्या भाजपाचा सामना होता. मोदी आणि त्यांचे गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये तब्बल ५० प्रचारसभा घेतल्या. पण संध्याकाळपर्यंत हे स्पष्ट झालं होतं की मोदींच्या पक्षाचा बंगालमध्ये पराभव झाला आहे. आणि दक्षिण भारतातल्या इतर दोन राज्यांमध्ये देखील भाजपा पराभवाच्या मार्गाला लागलं होतं”, असं देखील या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Washington post criticizes pm narendra modi on west bengal election result pmw

ताज्या बातम्या