Ishan Tharoor Washington Post layoff : गेल्या काही महिन्यांत ई-कॉमर्स कंपन्या असतील किंवा आयटी कंपन्यांमध्ये हजारो कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्याचं पाहायला मिळालं. आता जगातील सर्वात प्रतिष्ठित वृत्तपत्र मानल्या जाणाऱ्या वॉशिंगटन पोस्टमध्येही मोठ्या प्रमाणात नोकर कपात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
वॉशिंगटन पोस्टने तब्बल ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे. या ३०० कर्मचाऱ्यांमध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा मुलगा इशान थरूर यांचाही समावेश आहे. इशान थरूर यांची देखील नोकरी गेली असून नोकरी गेल्यानंतर इशान थरूर यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. जागतिक पत्रकारितेसाठी हा अत्यंत दुर्दैवी दिवस असल्याचं इशान थरूर यांनी म्हटलं आहे.
इशान थरूर यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?
“आज @washingtonpost मधून मला आणि आंतरराष्ट्रीय विभागातील माझ्या अनेक सहकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आलं आहे. जानेवारी २०१७ मध्ये मी वर्ल्डव्ह्यू कॉलम सुरू केला होता आणि हा कॉलम सुरू करणं माझ्यासाठी मोठा सन्मान होता, त्यासाठी ५ लाख वाचकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी ऋणी आहे”, असं इशान थरूर यांनी म्हटलं आहे.
इशान थरूर यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये रिकाम्या ऑफिसचा फोटो शेअर केला असून त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये जागतिक पत्रकारितेसाठी हा अत्यंत दुर्दैवी दिवस असल्याची भावना इशान थरूर यांनी व्यक्त केली आहे.
A staggering statement from former Washington Post editor Marty Baron: "This ranks among the darkest days in the history of one of the world's greatest news organizations." pic.twitter.com/xWQrN8B1P4
— Ben Mullin (@BenMullin) February 4, 2026
समोर आलेल्या वृत्तानुसार, वॉशिंगटन पोस्टने तब्बल ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. यामध्ये अनेक अनुभवी पत्रकारांना देखील नारळ देण्यात आलं आहे. यामध्ये ब्युरो प्रमुख, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, काही संपादकांचा देखील समावेश आहे.

