बंगळुरुच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या शशिकला यांना तुरूंगात विशेष सुविधा पुरवल्या जात असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र, आता यापेक्षाही धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत आपण उत्तर भारतामधील कथानकावर आधारित एखाद्या चित्रपटात ‘बाहुबली’ कैद्यांना तुरूंगात इतर कैद्यांपेक्षा विशेष सुविधा पुरवल्या जात असल्याचे पाहिले असेल. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बंगळुरू मध्यवर्ती कारागृहातील क्लीपवरून शशिकला यांनीही ही कला साध्य केल्याचे दिसते.

बंगळुरुच्या मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये साध्या वेषातील शशिकला तुरूंगाबाहेरून आतमध्ये येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी तुरूंगाच्या प्रवेशद्वारावर अनेक सुरक्षारक्षक तैनात होते. मात्र, तरीही शशिकला यांना कपड्यांवरून कोणीही हटकले नाही. एरवी तुरूंगातील सर्व महिला कैद्यांना पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान करणे बंधनकारक आहे. मात्र, शशिकला या नियमाला अपवाद असल्याचे सिद्ध झाले आहे. बंगळुरू मध्यवर्ती कारागृहाच्या माजी प्रमुख आणि पोलीस उपमहानिरीक्षक (तुरुंग) यांनी डी. रूपा यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांकडे हे सीसीटीव्ही फुटेज सोपवले होते.

यापूर्वी डी. रूपा यांनी अहवाल सादर करून शशिकला यांना तुरूंगात विशेष सुविधा पुरवण्यात येत असल्याचा आरोप केला होता. या व्हीआयपी सुविधांसाठी शशिकला यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दोन कोटी रूपयांची लाच दिल्याचेही त्यांनी म्हटले होते. शशिकला यांच्या जेवणासाठी तुरुंगात विशेष स्वयंपाकगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी दोन कोटींचा व्यवहार झाला आहे. स्वत: पोलीस महासंचालकदेखील यामध्ये सामील आहेत, असे डी. रुपा यांनी त्यांच्या वरिष्ठांना दिलेल्या अहवालात नमूद केले होते.

याआधी १० एप्रिल रोजी आलेल्या एका वृत्तानुसार, अण्णाद्रमुक पक्षाच्या सचिव शशिकला आता १५ दिवसांमध्ये केवळ ४ ते ६ वेळा त्यांच्या निकटवर्तीयांना भेटू शकतात. ‘याआधी नियम ५८४ अंतर्गत शशिकला यांना सूट देण्यात आली होती,’ अशी माहिती पोलीस महासंचालक (तुरुंग) सत्यनारायण राव यांनी दिली होती. माहिती अधिकारांतर्गत दाखल केलेल्या एका अर्जाला मिळालेल्या उत्तरामुळे वाद निर्माण झाला होता. शशिकला महिन्याभरात १४ वेळा २८ लोकांना भेटल्याची आकडेवारी माहिती अधिकारांतर्गत उजेडात आली होती.