तामिळनाडूतील सेलम येथे दोन बसचा जोरदार अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ३० जण जखमी झाले आहेत. बसच्या आत लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला आहे. जखमींना सेलम आणि एडप्पाडी येथील सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

अपघातात ३० प्रवासी जखमी

मंगळवार, १७ मे रोजी संध्याकाळी एडप्पाडी येथून ३० प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसची तिरुचेंगोडे येथून जाणाऱ्या दुसऱ्या खासगी बसला धडक बसल्याने हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता, की धडकेनंतर बसचा चालक उडून बाजूला पडला. तर चालकाच्या बाजूला बसलेला प्रवासी जोरात बसच्या समोरच्या काचेला आदळलेला व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

३ प्रवाश्यांची प्रकृती चिंताजनक
या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर, सर्व जखमींना सेलम आणि एडप्पाडी येथील सरकारी आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

वृत्तानुसार, एक खाजगी बस ३० प्रवाशांसह इडाप्पाडीहून सांकारीकडे जात होती तर तिरुचेंगोडे येथील केएसआर शैक्षणिक संस्थेची महाविद्यालयीन बस ५५ विद्यार्थ्यांसह सांकारी मार्गे इडाप्पाडीकडे जात होती. दोन्ही बसेस जेव्हा एडप्पाडी – सांकारी महामार्गावरील कोझीपन्नई बस स्टॉपवर पोहोचल्या तेव्हा त्यांची समोरासमोर जोरात धडक झाली.