US attack Iranian warship video Indian Ocean: इराणी युद्धनौकेवर हल्ला करुन हिंदी महासागरात जलसमाधी दिल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी दिली आहे. इराणी युद्धनौका ‘आयरिस देना’ (IRIS Dena) श्रीलंकेच्या जवळ असताना अमेरिकन पाणबुडीने तिच्यावर हल्ला केला. अमेरिकेने या हल्ल्याचा एक व्हिडिओ आता प्रसिद्ध केला आहे. हा हल्ला एवढा भीषण होता की युद्धनौकेच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या हल्ल्यात नौकेवरील ८० जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

हल्ल्याबाबत अमेरिकेने दिली माहिती

आंतरराष्ट्रीय पाण्यात सुरक्षित आहोत असे समजत असलेल्या इराणी युद्धनौकेला अमेरिकन पाणबुडीने हल्ला करुन जलसमाधी दिली. युद्धनौकेवर प्रचंड क्षमतेचे टॉर्पिडो डागण्यात आले. दुसऱ्या विश्व युद्धानंतर पहिल्यांदाच टॉर्पिडोचा वापर करुन युद्धनौका बुडवल्याचा दावा पीट हेगसेथ यांनी केला.

अमेरिकेने प्रसिद्ध केला व्हिडिओ

इराणी युद्धनौकेवर अमेरिकन पाणबुडीने केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ अमेरिकेच्या युद्ध विभागाने (Department Of War) प्रसिद्ध केला आहे. हल्ल्यानंतर युद्धनौकेच्या चिंधड्या उडाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तसेच, पाण्याच्या उंच लाटा आणि आगीचे लोट देखील दिसून येत आहेत.

८० जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

या युद्धनौकेवर १८० जण होते, त्यापैकी ८० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक जखमींना उपचारासाठी श्रीलंकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अद्याप अनेकजण बेपत्ता आहेत. युद्धनौकेवरील हल्ल्याची माहिती मिळताच श्रीलंकेच्या नौदल आणि लष्कराने मदतीचा हात देत बचाव आणि शोधकार्य राबवले.

इराणी युद्धनौका सरावासाठी आली होती भारतात

इराणी युद्धनौका आयरिस देना गेल्या महिन्यात भारतात सरावासाठी आली होती. सरावानंतर या युद्धनौकेचा परतीचा प्रवास सुरु होता. बंगालच्या उपसागरात ती १८ ते २५ फेब्रुवारी दरम्यान सरावात भाग घेणार असल्याचे सरावाच्या वेळापत्रकात नोंद दिसून येते. भारतीय पूर्व नौदल कमांडने विशाखापट्टणम येथे या इराणी जहाजाचे स्वागत केले होते.