जर हवेतील आद्र्रतेने स्मार्टफोन व लॅपटॉप चार्जिग करता आले तर . कुणी म्हणेल ही कल्पनाच मूर्खपणाची आहे, कारण स्मार्टफोन किंवा लॅपटॉप  पाण्याने खराब होतात मग आद्र्रतेने म्हणजे पाण्याच्या थेंबांनी ही उपकरणे चार्ज कशी करणार? पण ‘एमआयटी’ या अमेरिकेतील संस्थेच्या वैज्ञानिकांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.
जलबिंदूंचे प्रतिकर्षण करणाऱ्या पृष्ठभागावरून घरंगळणारे जलबिंदू हे विद्युतभारित असतात. सुपरहायड्रोफोबिक पृष्ठभागावरून घरंगळणाऱ्या या जलबिंदूंचे संघनन होते तेव्हा त्यांना विद्युतभार प्राप्त होतो. या प्रक्रियेच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालवण्यास पुरेशी असलेली विद्युत ऊर्जा तयार होऊ शकते. मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील नेनाद मिल्जकोविक व एव्हलीन वँग  व त्यांच्या सहकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, यामुळे सेलफोन किंवा इतर उपकरणे चार्ज करता येतात, पण त्यासाठी हवेत पुरेशी आद्र्रता असली पाहिजे.
त्यांच्या मते मिल्कोजोविक यांनी सांगितले की, आद्र्रतेच्या मदतीने चार्ज करणारे हे उपकरण साधे असेल. त्यात एकमेकांत गुंफलेल्या धातूच्या पट्टय़ा असतील. प्रायोगिक पातळीवर तांब्याच्या पट्टया वापरण्यात आल्या कारण ते अ‍ॅल्युमिनियमपेक्षा स्वस्त असून विद्युतवाहक असल्याने त्याचा वापर करण्यात आला.
सुरूवातीच्या चाचण्यात १५ पिकोवॅट म्हणजे एक ट्रिलीयांश वॅट इतकी ऊर्जा धातूच्या पट्टीवर प्रत्येक चौरस सेंटिमीटरला तयार झाली. एक  मोबाईल १२ तासांसाठी चार्ज करण्यासाठी चौरस सेंटीमीटरला १ मायक्रोवॅट ऊर्जा तयार होणे आवश्यक आहे. प्रत्येक बाजूला ५० सेंटिमीटर पृष्ठभागाच्या घनाकृतीचा वापर करता येईल. यात काही मर्यादा आहेत, कारण ही प्रक्रिया संघननावर अवलंबून आहे व त्याला आद्र्रता असलेले वातावरण लागते. हवेतील तापमानही कमी असावे लागते.
प्रत्यक्ष असे उपकरण तयार करताना धातूच्या दोन पट्टय़ा रेडिएटरमध्ये वापरतात, त्याप्रमाणे एकमेकांना स्पर्श करणार नाहीत अशा पद्धतीने वापरता येतील. त्यात हलणारे भाग नसतील. त्यात पर्यावरण संवेदक वापरले जातील व सकाळच्यावेळात काही तासातील दवामुळे या उपकरणाने चार्जिग करता येईल. वातावरणातील पाण्याचे संघनन नैसर्गिकरित्या होऊन त्याचा असा वापर करता येईल. ‘अ‍ॅप्लाइड फिजिक्स लेटर्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.