Water Found on Mars : जगभरातील अंतराळ संशोधन संस्था अनेक वेगवेळे संशोधन करत असतात. आता मंगळ ग्रहाबाबत एक नवीन संशोधन समोर आलं आहे. मंगळावर पाणी असल्याची माहिती एका संशोधनामधून समोर आली आहे. या संशोधनानुसार, मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाच्या खाली खोलवर पाण्याचा एक मोठा साठा असू शकतो. मंगळाच्या पृष्ठभागाखाली खडकांमध्ये पाण्याचा एवढा मोठा साठा असू शकतो की, ज्यामध्ये एखादा समुद्र भरण्यासाठी पुरेसे पाणी असू शकते, असं नासाच्या इनसाइट लँडरच्या डेटावर आधारित अभ्यासावरून ही माहिती समोर आल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

नासाच्या इनसाइट लँडरच्या डेटावरील आधारित एक संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनानुसार, मंगळाच्या पृष्ठभागाखाली १० ते-२० किलोमीटर खोलपर्यंत पाण्याचा भूगर्भीय साठा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हे इनसाइट लँडर २०१८ पासून ते २०२२ पर्यंत याबाबतचं मिशन पूर्ण होईपर्यंत कार्यरत होतं. त्याने जो डेटा प्रदान केला, त्या डेटाच्या आधारे शास्त्रज्ञांना हा संभाव्य जलसाठा उघड करण्यात मदत झाली आहे. असं टाइम्स ऑफ इंडियाने एका वृत्तात म्हटलं आहे.

हेही वाचा : Chhattisgarh : महिलेच्या ‘या’ तगाद्यानं घटस्फोटित पती अन् प्रियकर वैतागला, दोघांनी ‘दृष्यम’ चित्रपट पाहिला अन्…; खळबळजनक घटना समोर

दरम्यान, मंगळाच्या पृष्ठभागाच्या खाली अंदाजे ११ ते २० किमी खाली स्थित पाणी आहे. हे पाणी अग्निजन्य खडकांमध्ये अडकलेले आहे. या खोलीवर तापमान पाणी टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे असते. याबाबत कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यात काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.

हे संशोधन कसं झालं?

कॅलिफोर्निया विद्यापीठातील ग्रहशास्त्रज्ञ वाशन राइट यांनी याबाबत सांगितलं की, “सध्याच्या मंगळावरील पृष्ठभागाखाली पाण्याची उपस्थिती ही भूकंपाच्या लहरींच्या गतीचे विश्लेषण करून निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये खडकांची रचना, भेगा आणि त्या भरणाऱ्या गोष्टींवर अवलंबून या लाटा वेग बदलतात. या खडकांमधील भेगांमधून सर्व पाणी बाहेर काढले तर ते १-२ किलोमीटर खोल जागतिक महासागर भरू शकेल.”

दरम्यान, या संशोधनाबाबत कॅलिफोर्निया विद्यापीठातील ग्रहशास्त्रज्ञ आणि या संशोधनाचे सह-लेखक मायकेल मंगा यांनी म्हटलं की, यामधून असंही दिसून आलं की, पृथ्वीच्या भूजल प्रक्रियेप्रमाणेच पाणी पृष्ठभागावर जाऊ शकतं. पाण्याच्या या ऐतिहासिक हालचालीवरून असं दिसतं की मंगळ ग्रह पहिल्यापासून पाण्याने भरलेला असावा.

मंगळाच्या भूगर्भातील जलसाठ्याच्या शोधामुळे तीन अब्ज वर्षांपूर्वी मंगळ हा नद्या, तलाव आणि शक्यतो महासागर असलेला ग्रह होता, असं हा अभ्यास सुचवितो. मात्र, यानंतर हा पाण्याचा भाग भूगर्भातील कवचामध्ये गेला. तीन अब्ज वर्षांपूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात द्रवरूप पाणी अस्तित्वात होते. यातील बरेचसे पाणी भूपृष्ठात वाहून गेले असे गृहित धरले जाते, असं या संशोधनात म्हटलं आहे.