इस्त्रोच्या चांद्रयान -२ मोहिमेबाबत एक उत्कंठावर्तक माहिती समोर आली आहे. चांद्रयान -२ चे ऑरबिटर हे यान चंद्राभोवती सुमारे १०० किलोमीटर उंचीवर फिरत आहे. या ऑरबिटरवरील इमॅजिंग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर या उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागाची असंख्य छायाचित्रे काढली. या छायाचित्रांच्या अभ्यासाद्वारे चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचा दावा इस्त्रोचे माजी अध्यक्ष एस एस. किरणकुमार यांनी केला आहे. अर्थात हे पाणी पृथ्वीवर आढळणाऱ्या प्रवाही, गोठलेल्या किंवा वाफेच्या स्वरुपात नाहीये. तर छायाचित्रांच्या अभ्यासाद्वारे plagioclase ( प्लेगियोक्लेज ) प्रकारच्या खडकांत हायड्रोक्सिल ( OH ) आणि पाणी ( H2O ) यांचे रेणू आढळले आहेत. ऑरबिटरवरने काढलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करत एक शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या शोधनिबंधाचे एस एस. किरणकुमार हे सहलेखक आहेत.

चंद्रावर पाण्याचा शोध आधी कोणी लावला होता ?

२००८ च्या चांद्रयान – १ मोहिमेत भारताचे अस्तित्व चंद्रावर उमटावे या हेतूने तिरंग्याचे चित्र असलेला एक मून इम्पॅक्ट प्रोब हा चंद्राच्या पृष्टभागावर धडकवण्यात आला होता. यामुळे उडालेल्या चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे घेण्यात आली होती. त्याद्वारे चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचं सिद्ध झालं होतं. चंद्रावर पाण्याचे अस्तित्व हे भारताच्या चांद्रयान -१ मोहिमेमुळे सिद्ध झाले होते. आता चांद्रयान -२ च्या मोहिमेद्वारे पुन्हा एकदा चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचे दाखवून दिले आहे.

चांद्रयान -२ मोहिम काय होती ?

२२ जुलै २०१९ ला चांद्रयान – २ हे चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित करण्यात आले होतं. ७ सप्टेंबर ला चांद्रयान -२ चे ‘विक्रम लॅंडर’ हे चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरणार होते आणि त्यानंतर या लॅंडरमधील रोव्हर हा चांद्रभुमिवर संचार करणार होता. पण विक्रम लॅंडर हा चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद न उतरता वेगाने कोसळला आणि ती मोहिम अपयशी झाली होती. असं असलं तरी चांद्रयान -२ चा ऑरबिटर हे यान तेव्हापासून चंद्राभोवती १०० किलोमीटर उंचीवरुन यशस्वीपणे अजुनही फिरत आहे. याच ऑरबिटरने घेतलेल्या छायाचित्रांमुळे चंद्रावर पुन्हा एकदा पाण्याचे अस्तित्व असल्याचे अभ्यासाद्वारे सांगितलं आहे.