कार्बन उत्सर्जनावरून भारतावर असलेल्या आंतरराष्ट्रीय दबावास जुमानणार नसल्याचे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिले. ते म्हणाले की, आम्ही जास्तीत जास्त सौर ऊर्जा व पवन ऊर्जा वापरावर भर देत आहोत. त्यामुळे आम्हीच पर्यावरण रक्षण करीत आहोत; पण पर्यावरण रक्षणासाठी जे जगाचे नेतृत्व करतात, जगाला शिकवण देतात, तेच भारताला अणू ऊर्जेसाठी आवश्यक इंधन देत नाहीत, असा आरोप मोदी यांनी सोमवारी पर्यावरण परिषदेत केला.
अणू ऊर्जा पर्यावरण रक्षणाचे प्रभावी साधन आहे. अणू ऊर्जेच्या वापरावर आमचा भर आहे. त्यासाठी गुंतवणूक करण्याची तयारी आहे; परंतु आम्हाला इंधन दिले जात नाही. त्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव टाकावा लागेल, असेही मोदी म्हणाले. पर्यावरण रक्षणकर्ते म्हणवणारे स्वत: कार्बन उत्सर्जन कमी करण्याऐवजी इतरांवर र्निबध घालण्यासाठी नियम बनवतात. भारत मात्र कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांमध्ये आहे. पर्यावरणाच्या बंधनापेक्षा जीवनशैलीत मूलभूत परिवर्तन केल्यास हवामान बदलाच्या समस्येचे समाधान शोधता येईल, असे मोदी म्हणाले.
वस्तूंच्या पुनर्वापरावर मोदी यांनी भर दिला. घन कचरा व्यवस्थापन, कचऱ्यापासून खतनिर्मिती आदी प्रयोग वाढले पाहिजेत. कचऱ्यापासून खतनिर्मिती वाढल्यास उत्पादनात गुणात्मक वाढ होईल. याशिवाय रासायनिक खतांवर दिली जाणारी सूट कमी होईल. आपापल्या राज्यात यावर विशेष भर देण्याची सूचना पंतप्रधान मोदी यांनी विविध राज्यांच्या पर्यावरणमंत्र्यांना केली.

‘आदिवासींची विरोधकांकडून दिशाभूल’
जमीन अधिग्रहण कायद्यात आदिवासींशी संबंधित एकही शब्द नाही, तरीही विरोधक हा कायदा आदिवासीविरोधी असल्याचा खोटा प्रचार करीत आहेत. विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करीत आहेत. यातून त्यांना राजकीय लाभ होत असला तरी देशाचे मोठे नुकसान होत असल्याचा हल्ला मोदी यांनी चढवला. याबाबत अत्यंत आक्रमकपणे त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. जमीन अधिग्रहण कायद्यात जंगल, आदिवासींच्या जमिनीचा उल्लेख नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदा आहे. जमीन अधिग्रहण कायद्याशी त्याचा काडीचाही संबंध नाही, असेही ते म्हणाले.

रविवारी ऊर्जा बचत करा
भारतीय युवकांना ‘रविवारी सायकल’ वापरण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. ते म्हणाले की, अर्थात आता काही जण मोदी सायकल कंपन्यांचे एजंट झाल्याची ओरड करतील. हीच मानसिकता दुर्दैवी आहे. ‘रविवारी सायकल’चा अर्थ केवळ सायकल विकत घेणे असा होत नाही, तर रविवारी ऊर्जा बचत करा, हा संदेश यामागे आहे.