Iran Foreign Minister Abbas Araghchi warns to US: अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात सुरू केलेले युद्ध आठ दिवसांपासून सुरू आहे. या युद्धामुळे पश्चिम आशियातील आखाती प्रदेशात अस्थिर वातावरण निर्माण झाले असून जगावर ऊर्जा संकट ओढवले आहे. आखाती प्रदेशातून होणाऱ्या इंधन आणि गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. अशातच इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी युद्धबंदीच्या चर्चांना फेटाळून लावले आहे. अमेरिका जर जमिनीवरील हल्ला करणार असेल तर इराण त्यासाठी सज्ज आहे, अशी भूमिका अराघची यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडली.
अब्बास अराघची यांनी एनबीसी न्यूजला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अमेरिकेबरोबर युद्धबंदीची चर्चा होणार नाही, असे ठामपणे सांगितले. तसेच जर अमेरिकेने जमिनीवरील हल्ल्याचा प्रयत्न केला तर इराणचे लष्कर त्यांना तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. अमेरिकेने जमिनीवरील हल्ल्याचा प्रयत्न केल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असाही इशारा त्यांनी दिला.
आम्हाला विश्वास आहे की, आम्ही त्यांचा सामना करू आणि त्यांच्यासाठी हे मोठे संकट असेल, असे एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अराघची म्हणाले.
‘आम्ही त्यांची वाटच पाहतोय’
एनबीसी न्यूजचे पत्रकार टॉम लामास यांनी अराघची यांना प्रश्न विचारला की, तुम्हाला अमेरिकेच्या जमिनीवरील हल्ल्याची भीती वाटते का? यावर अराघची यांनी एका वाक्यात उत्तर दिले. ते म्हणाले, “आम्ही त्यांची वाटच पाहतोय.”
आपल्या विधानाचा अर्थ सांगताना अराघची पुढे म्हणाले, “आम्ही त्यांची वाट पाहतोय याचा अर्थ आम्ही युद्ध सुरू ठेवण्यासाठी हे बोलत आहोत, असे नाही. पण आम्ही कोणत्याही परिस्थितीला, कोणत्याही आव्हानांना आणि शक्यतांना तोंड देण्यासाठी सज्ज आहोत, हे आम्हाला याठिकाणी सांगायचे आहे.”
इराणने वाटाघाटीच्या चर्चा नाकारल्या
युद्ध थांबविण्यासाठी इराणकडून वाटाघाटाची चर्चा होणार नाही, तसेच आम्ही युद्धबंदीची मागणी केली नाही, असेही अराघची यांनी स्पष्ट केले. सध्या इराणची राजधानी तेहरानसह संपूर्ण इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायलची क्षेपणास्त्र डागली जात आहेत. तरीही इराण आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
अराघची म्हणाले, अमेरिकेशी वाटाघाटी करण्याचा आम्हाला कोणताही सकारात्मक अनुभव नाही. मागच्या वर्षी आणि यावर्षीही आम्ही अमेरिकेच्या विद्यमान प्रशासनाबरोबर वाटाघाटीच्या चर्चा केल्या होत्या. या चर्चांदरम्यानच पुन्हा आमच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
