जम्मू- काश्मीरमध्ये शहीद झालेले जवान मुस्लीम असल्याचे सांगणाऱ्या एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना सैन्याने प्रत्युत्तर दिले आहे. शहिदांचा धर्म नसतो, त्यांच्या बलिदानाला आम्ही धार्मिक रंग देत नाही. ज्यांनी शहिदांच्या धर्मावर भाष्य केले त्यांना सैन्याची पुरेशी माहिती नसावी, अशा शब्दात सैन्याच्या अधिकाऱ्यांनी ओवेसींना फटकारले आहे.

जम्मू- काश्मीरमधील सुंजवान येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी शनिवारी सकाळी हल्ला केला होता. या हल्ल्यात शहीद झालेले जवान मुस्लीम होते. आता मुस्लिमांच्या देशभक्तीवर शंका घेणारे कुठे आहेत, असा सवाल ओवेसी यांनी विचारला होता. मुसलमानांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणाऱ्यांनी आणि त्यांना पाकिस्तानी म्हणणाऱ्यांनी यावरून धडा घ्यायला हवा. आम्ही तर देशासाठी जीव देत आहोत, असे ओवेसींनी म्हटले होते. यावर सैन्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी प्रतिक्रिया दिली. सैन्याच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले, ज्यांनी अशा स्वरुपाचे विधान केले आहे त्यांना सैन्याविषयी पुरेशी माहिती नाही. आम्ही कधीच शहिदांचा धर्म बघत नाही. शहिदांचे  राजकारण करु नका, असे आवाहनही त्यांनी केले.

तरुणांचे दहशतवादी संघटनेत भरती होण्याचे प्रमाण वाढणे ही चिंतेची बाब आहे. दहशतवाद वाढण्यासाठी सोशल मीडिया देखील कारणीभूत ठरत आहे. सोशल मीडियामुळे जास्त तरुणांपर्यंत पोहचणे शक्य झाले आहे. आता या समस्येवर मात करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. २०१७ मध्ये आम्ही दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांनाच लक्ष केले आणि यात आम्हाला यश देखील आले, असे त्यांनी सांगितले. शत्रू राष्ट्र आता वैतागला आहे. सीमेवर अपयश येत असल्यानेच त्यांनी आता लष्करी तळांवर हल्ला करायला सुरुवात केली, असेही ते म्हणालेत.

जैश-ए- मोहम्मद, लष्कर- ए- तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या तिन्ही दहशतवादी संघटना आमच्यासाठी समानच आहेत. हातात बंदुक घेतलेला प्रत्येक जण आमच्यासाठी दहशतवादीच आहे मग तो कोणत्याही संघटनेचा असू दे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.