विमानतळावरच्या रेस्तराँमध्ये गेल्यानंतर एका प्रवाशाने व्हेज बिर्याणी म्हणजेच शाकाहारी बिर्याणी खाण्यासाठी मागवली. बिर्याणी आल्यानंतर तो खाऊ लागला, पण त्यात चिकनचे तुकडे आढळले त्यामुळे त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं काय घडलं आपण जाणून घेऊ.

नेमकं काय घडलं?

ही घटना बंगळुरू विमानतळावरची आहे. @PiyushpaviA हे अकाऊंट असलेल्या एका व्यक्तीने एक्स पोस्ट करत त्याचा अनुभव कथन केला आहे. तो म्हणतो बंगळुरू विमानतळावरच्या टर्मिनल १ जवळ असलेल्या एका रेस्तराँमधून मी व्हेज बिर्याणी मागवली. पण त्यात चिकनचे तुकडे होते. त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे बघा मला जे बिल दिलं गेलं आहे ते व्हेज बिर्याणीचं आहे. पण चिकनचे तुकडे या बिर्याणीत दिसत आहेत.

या प्रवाशाने सांगितलं मी आणि माझं कुटुंब शाकाहारी आहोत तरीही..

या प्रवाशाने पुढे सांगितलं मी आणि माझं कुटुंब शाकाहारी आहोत. आम्ही अंडेही खात नाही. मात्र विमानतळावर जो अनुभव आला त्यामुळे मी आणि माझं कुटुंब नाराज झालं आहे. मी, माझ्या मुलांनीही ती बिर्याणी खाल्ली. दुसरीकडे या प्रवाशाने असंही सांगितलं की आम्ही रेस्तराँच्या मॅनेजरला बोलवलं आणि त्याने जे मान्य केलं की होय व्हेज बिर्याणीत चिकनचे तुकडे होते ते त्याचं म्हणणं आम्ही रेकॉर्ड केलं आहे. यानंतर या व्यक्तीने विमानतळावरचे रेस्तराँ आणि तिथे मिळणाऱ्या जेवणाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच त्याने आपली पोस्ट बंगळुरू विमानतळ, एअरसेवा आणि सरकारी अधिकाऱ्यांना टॅग केली आहे. या रेस्तराँचं सीसीटीव्ही फुटेज तपासावं अशी मागणी त्यांनी आपल्या पोस्टमधून केली आहे. बंगळुरू विमानतळावरच्या टेस्ट ऑफ इंडिया रेस्तराँ या ठिकाणी हा प्रकार घडला आहे.

प्रवाशाने केलेली पोस्ट व्हायरल

या प्रवाशाने पुढे म्हटलं आहे आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत त्यामुळे व्हेज बिर्याणी मागवली होती. पण बिर्याणीत चिकनचे ४ तुकडे होते. रेस्तराँने ही बाब मान्य केली की व्हेज बिर्याणीत चिकनचे तुकडे होते. News 18 ने हे वृत्त दिलं आहे. तसंच या प्रवाशाने असंही म्हटलं आहे की सदर प्रकारामुळे आणि माझ्या कुटुंबाने मानसिक त्रास सहन केला. आम्ही पूर्ण बिलही भरलं पण या प्रकारानंतरही त्यांनी रिफंड पॉलिसी नाही म्हणत कानांवर हात ठेवले आहेत. या प्रवाशाने केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

सोशल मीडियावर लोक या घटनेबाबत कसे व्यक्त झाले आहेत?

एका युजरने म्हटलं आहे की तुम्ही जो पदार्थ निवडला त्याची काळजी घेणं ही रेस्तराँची जबाबदारी आहे. अशा चुका कधीही कुठे होताना दिसत नाही. मात्र तुम्हीही काळजी घ्या, यापुढे प्युअर व्हेज रेस्तराँलाच भेट द्या अगदी एअरपोर्टवर जेवलात तरीही. दुसरा एक युजर म्हणाला की तुम्ही चिकन पिस असलेली बिर्याणी खाल्ल्यानंतर तक्रार का करत आहात, पहिला तुकडा दिसला तेव्हाच तक्रार का केली नाहीत? तर दुसऱ्याने म्हटलं आहे की तुम्ही रेस्तराँविरोधात पोलीस तक्रार करा. अशा प्रकारे लोक या प्रकरणी व्यक्त होत आहेत.